आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशनचे अध्यक्ष जितेंद्र पाटील यांना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई यांच्याकडून गौरव |१५० हून अधिक पुरस्कारांच्या यादीत आणखी एक सन्मान.
ठाणे | प्रतिनिधी
आरोग्य व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे श्री जितेंद्र केवलसिंग पाटील (अध्यक्ष – आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशन) यांना "समाजभूषण पुरस्कार" प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई यांच्या वतीने देण्यात आला असून, समाजसेवा क्षेत्रातील त्यांच्या अमूल्य योगदानाची ही दखल आहे.
सदर पुरस्कार वितरण समारंभ ठाणे येथील कोर्टनाका येथे पार पडला. या वेळी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे, उद्योगपती नानजीभाई ठक्कर, मुंबई प्रदेशाध्यक्ष प्रवीण सपकाळे, मंत्रालय विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे, नितीन शिंदे व इतर मान्यवर उपस्थित होते.
कोरोना काळातील कार्य ठरले मैलाचा दगड
कोरोनासारख्या जागतिक संकटात समाज भयभीत असताना जितेंद्र पाटील यांनी विविध उपक्रम राबवून जनतेला आधार दिला. त्यांनी मोफत जेवण, धान्य, शिधा, औषधे आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. त्याचप्रमाणे मोफत आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे, अत्यल्प दरात रुग्णवाहिका सेवा, अनाथाश्रमातील मुलांना आवश्यक साहित्य आणि जेवणाची व्यवस्था त्यांनी केली.
याशिवाय, अपंग व्यक्तींना जयपूर फूट, कॅलिपर व सायकल यांचे मोफत वाटप करून त्यांच्या जीवनात आनंदाचे क्षण निर्माण केले.
१५० राष्ट्रीय आणि ५ आंतरराष्ट्रीय पुरस्कारांचा गौरव
जितेंद्र पाटील यांचे सामाजिक योगदान देशभरात ओळखले जाते. आतापर्यंत त्यांना १५० राष्ट्रीय व ५ आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. “सेवा परमो धर्म” हे ब्रीद उराशी बाळगून, त्यांनी “जनसेवा हीच ईश्वर सेवा” या तत्त्वाचे उत्तम उदाहरण समाजापुढे ठेवले आहे.

