एरंडोल (प्रतिनिधी) - येथील राजमाता जिजाऊ महिला मंडळाने खान्देशी परंपरेला जपत आखाजीचा (अक्षयतृतीया) गौराईचा सण उत्साहात साजरा केला. यावेळी पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करीत यावेळी शहीद झालेल्या भारतीयांना भावपूर्ण श्रध्दांजली वाहण्यात आली.
सरस्वती कॉलनीतील ज्येष्ठ पत्रकार प्रा. शिवाजीराव अहिरराव आणि माजी नगराध्यक्षा तथा राजमाता जिजाऊ महिला मंडळ अध्यक्षा शकुंतला अहिरराव यांच्या निवासस्थानी गौराईचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. 21 व्या शतकातील धकाधकीच्या जीवनात जुन्या परंपरेचा लोप होत असतांना जिजाऊ महिला मंडळाने आगळावेगळा कार्यक्रम पार पाडला.
यावेळी गौराईची स्थापना करून विविध खाद्य पदार्थांच्या माळा तयार करून तसेच सांजोरीचा नैवेद्य दाखविण्यात येवून महिला सदस्यांनी माहेरवाशिण असल्याचा आनंद घेतला. यावेळी महिला मंडळ सदस्यांनी दांडीया, झोके खेळून आनंद साजरा केला.
आधीच्या काळात सासुरवाशिणीला विश्रांती मिळावी म्हणून ती आखाजी सणाची वाट पाहायची. आजच्या घडीला तोच आनंद महिलांच्या चेहर्यावर राजमाता जिजाऊ महिला मंडळाने दिला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शकुंतला अहिरराव, शशिकला जगताप, इंदिराताई, शकुंतला पाटील, वंदना पाटील, सुरेखा पाटील, लताताई, मनिषा पाटील, प्रणाली भोसले, रूपाली पाटील, वैशाली पाटील, वेदीका पाटील यांनी परिश्रम घेतले.
