एरंडोलमध्ये जुन्या परंपरेला उजाळा; बंद भोंगा पुन्हा वाजणार, १४ एप्रिलपासून नवा प्रयोग.


“जनसंवाद अभियान”अंतर्गत प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या मंगळवारी नागरिकांच्या समस्या ऐकून त्यांचे निराकरण..

ज्ञान दिनी उपक्रमाचा शुभारंभ; मोबाईल व्यसन कमी करून युवकांना मैदान, वाचन व छंदांकडे वळवण्याचा नगरपालिकेचा अभिनव निर्णय.

एरंडोल प्रतिनिधी /प्रमोद चौधरी.

एरंडोल नगरपालिकेच्या वतीने “डिजिटल डिटॉक्स” या अभिनव संकल्पनेअंतर्गत शहरात पुन्हा सायरन (भोंगा) सुरू करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. या उपक्रमाचा शुभारंभ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी, म्हणजेच १४ एप्रिल रोजी “ज्ञान दिन” म्हणून करण्यात येणार आहे.

पूर्वी एरंडोल शहरात सकाळ, दुपार व रात्री विशिष्ट वेळेस सायरन वाजवून नागरिकांचे दैनंदिन जीवन शिस्तबद्ध केले जात होते. मात्र कालांतराने मोबाईल, घड्याळे यांसारख्या आधुनिक साधनांमुळे ही परंपरा बंद झाली होती. आता नव्या संकल्पनेतून या सायरनला सामाजिक संदेशाचे माध्यम बनवण्यात आले आहे.नगराध्यक्ष डॉ. नरेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली, मुख्याधिकारी अमोल बागुल, उपनगराध्यक्षा सुनीता माळी व नगरसेवकांच्या मान्यतेने हा निर्णय घेण्यात आला. दररोज संध्याकाळी ६ वाजता व रात्री ८ वाजता सायरन वाजवण्यात येणार असून, या दोन तासांमध्ये नागरिकांनी विशेषतः युवक व विद्यार्थ्यांनी मोबाईल, इंटरनेट व टीव्हीपासून दूर राहून हा वेळ वाचन, खेळ किंवा छंद जोपासण्यासाठी वापरावा, असा उद्देश आहे.

आजच्या डिजिटल युगात युवकांमध्ये मोबाईल व सोशल मीडियाचे व्यसन झपाट्याने वाढत आहे. फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, यूट्यूब, इंस्टाग्राम यांसारख्या माध्यमांमुळे “स्क्रीन टाइम” मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. यामुळे शारीरिक, मानसिक व सामाजिक समस्या निर्माण होत असल्याचेही दिसून येत आहे.या पार्श्वभूमीवर युवकांना पुन्हा मैदानी खेळ, व्यायाम, वाचन आणि संवाद याकडे वळवणे आवश्यक आहे. “डिजिटल डिटॉक्स” उपक्रम हा त्याच दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल मानला जात आहे. विशेष म्हणजे, असा उपक्रम राबविणारी एरंडोल नगरपालिका ही महाराष्ट्रातील पहिलीच नगरपालिका ठरणार आहे.

त्याचप्रमाणे प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी नगराध्यक्ष डॉ . नरेंद्र ठाकूर हे स्वतः शहरातील एका प्रभागास प्रत्यक्ष भेट देऊन त्या प्रभागातील स्वच्छता कर्मचारींसोबत स्वच्छता व श्रमदान करणार आहे .

याशिवाय, नगरपालिकेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत एकूण ४८ विकासकामांना मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये रस्ते रुंदीकरण व काँक्रीटीकरण, शहर प्रवेशद्वार बांधकाम, अभ्यासिका विकास, अंजनी नदी पुनरुज्जीवन, स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी निवास, अग्निशमन केंद्र उभारणी, सीसीटीव्ही बसविणे, सौर ऊर्जा प्रकल्प आदी महत्त्वपूर्ण निर्णयांचा समावेश आहे.तसेच “जनसंवाद अभियान” अंतर्गत प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या मंगळवारी नागरिकांच्या समस्या ऐकून त्यांचे निराकरण करण्यासाठी विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहे.