एरंडोल : महाराष्ट्र शासनाने १२ जून २०२६ पासून लागू केलेल्या ‘महाराष्ट्र माहिती अधिकार नियम २०२६’ मधील वाढीव शुल्क आणि काही नव्या तरतुदींवर माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनने तीव्र आक्षेप घेतला आहे. हे नियम तात्काळ रद्द करून पूर्वीचे नियम लागू करावेत, अन्यथा राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
यासंदर्भातील निवेदन एरंडोलचे उपविभागीय अधिकारी मनीषकुमार गायकवाड यांच्यामार्फत मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांना सादर करण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, माहिती अधिकार कायदा हा लोकशाही व्यवस्थेत पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढविण्यासाठी महत्त्वाचा कायदा असून भ्रष्टाचारावर नियंत्रण ठेवण्याचे प्रभावी माध्यम आहे. मात्र नव्याने लागू करण्यात आलेल्या नियमांमुळे सर्वसामान्य नागरिकांना माहिती मिळविण्याची प्रक्रिया अधिक कठीण होणार असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
नवीन नियमांनुसार माहिती अधिकार अर्ज शुल्क १० रुपयांवरून ३० रुपये, प्रथम अपील शुल्क २० रुपयांवरून ५० रुपये आणि द्वितीय अपील शुल्क २० रुपयांवरून १०० रुपये करण्यात आले आहे. तसेच माहितीच्या प्रतींसाठी प्रति पान शुल्क २ रुपयांवरून ५ रुपये करण्यात आले असून डिजिटल स्वरूपातील माहितीसाठीही शुल्क आकारण्याची तरतूद करण्यात आली आहे.
ही शुल्कवाढ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी, कामगार आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी अन्यायकारक असल्याचे फेडरेशनने म्हटले आहे. तसेच अर्जदाराने माहिती मागण्याचे कारण आणि भारतीय नागरिकत्वाचा पुरावा देणे अनिवार्य करण्यासही कार्यकर्त्यांनी विरोध दर्शविला आहे. ही अट माहिती अधिकार अधिनियम २००५ च्या कलम ६(२) च्या विरोधात असल्याचा दावा करण्यात आला आहे.
जाचक नियम तात्काळ मागे घेऊन माहिती अधिकाराची प्रक्रिया पूर्ववत सुलभ करावी, अन्यथा राज्यभर आंदोलनासह न्यायालयीन लढा उभारला जाईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
या निवेदनावर सिताराम मराठे, तुषार शिंपी, नितीन ठक्कर, राजधर महाजन, अरुण पाटील, अरुण नेटके, प्रभाकर महाजन, मधुकर सोनार, निलेश चौधरी, भूषण चौधरी आणि गणेश माळी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
