जामनेर : महाराष्ट्र भूषण डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा, ता. अलिबाग, जि. रायगड यांच्या वतीने जामनेर शहरात गणेशोत्सवानिमित्त भव्य निर्माल्य संकलन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. रविवार, दि. २० सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी नगराध्यक्षा सौ. साधनाताई महाजन, जामनेर पोलीस निरीक्षक (PI) श्री. निवृत्ती बोराडे, उपनगराध्यक्ष डॉ. प्रशांत भोंडे, श्री. जितेंद्र पाटील, श्री. महेंद्र बाविस्कर, श्री. आतिष झाल्टे, श्री. दीपक तायडे, श्री. सुहास पाटील यांच्यासह प्रतिष्ठानचे श्रीसदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गणेश विसर्जनासाठी येणाऱ्या भाविकांकडून विसर्जनापूर्वी निर्माल्य अत्यंत नम्रतेने स्वीकारून ते निर्माल्य कलशामध्ये संकलित करण्यात आले. जामनेर शहरात निर्माल्य संकलनासाठी दोन शिफ्टमध्ये नियोजन करण्यात आले असून सकाळी १० ते सायंकाळी ६ आणि सायंकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत श्रीसदस्य सेवा बजावत आहेत. या उपक्रमात एकूण ४१२ श्रीसदस्यांचा सहभाग आहे.
जामनेर शहरातील विविध ठिकाणी स्टॉल उभारून निर्माल्य संकलन करण्यात आले. संकलित केलेले निर्माल्य टाकळी येथे तयार करण्यात आलेल्या १० बाय ६ आकाराच्या खड्ड्यात टाकून त्यापासून कंपोस्ट खत तयार करण्यात येणार आहे. तसेच तयार होणारे कंपोस्ट खत वृक्षांना देण्यासाठी वापरण्यात येणार आहे.
प्रतिष्ठानच्या माध्यमातून रात्री ८ वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणात ओले निर्माल्य संकलित करण्यात आले. निर्माल्य संकलनासाठी ४ मालवाहू रिक्षा आणि ६ ट्रॅक्टर उपलब्ध करून देण्यात आले होते.
जामनेर परिसरातील तालुक्यातील १५ बैठकींच्या माध्यमातून या संपूर्ण उपक्रमाचे नियोजन व आयोजन करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे गणेशभक्तांनी कौतुक केले.

