एरंडोलच्या कसाई वाड्यात अतिक्रमण हटाव मोहीम; १६ ट्रॅक्टर साहित्य हटविले.

एरंडोल, एरंडोल बातम्या, एरंडोल नगरपरिषद, कसाई वाडा, अतिक्रमण हटाव मोहीम, अतिक्रमण निर्मूलन, जळगाव जिल्हा बातम्या, जळगाव न्यूज, महाराष्ट्र बातम्या, ताज्या बातम्या, अमोल बागुल, सुनील पवार

एरंडोल : शहरातील कसाई वाडा परिसरात एरंडोल नगरपरिषदेच्या वतीने अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्यात आली. सकाळी ११ वाजता सुरू झालेली ही कारवाई सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत सुरू होती. सुमारे साडेसहा तास चाललेल्या या मोहिमेत मुख्य रस्त्यावरील अतिक्रमित साहित्य, बांधकामाचे मटेरियल आणि इतर टाकाऊ वस्तू हटविण्यात आल्या. या कारवाईदरम्यान एकूण १६ ट्रॅक्टर साहित्य वाहून नेण्यात आले.


नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अमोल बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. नगरपरिषदेच्या पथकाने कसाई वाडा येथील मुख्य रस्त्यालगत असलेले अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली. या कारवाईत शेख अकबर शेख अब्बास, नासिर मुजावर आणि याकूब का सुपल खा यांच्याशी संबंधित अतिक्रमण हटविण्यात आल्याची माहिती देण्यात आली.



या मोहिमेत कार्यालय अधीक्षक एस. आर. ठाकूर, कर निरीक्षक जनार्दन येवले, रचना सहाय्यक सुमित उमराणे, आरोग्य निरीक्षक जीवन जाधव यांच्यासह आर. टी. महाजन, दीपक गोसावी, तुषार शिंपी, कैलास देशमुख, वैभव पाटील आणि आशिष परदेशी यांनी सहभाग घेतला.


कारवाईदरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.


शासकीय जागेवरील अतिक्रमण टाळण्याचे आवाहन...


शहरातील सार्वजनिक आणि शासकीय जागांवर तसेच मुख्य रस्त्यांवर अतिक्रमण करू नये, असे आवाहन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अमोल बागुल यांनी नागरिकांना केले आहे. रस्त्यांवरील अतिक्रमण हटविण्याच्या या कारवाईमुळे संबंधित परिसरातील रस्ते मोकळे ठेवण्याच्या नगरपरिषदेच्या प्रयत्नांना गती मिळाली आहे.