एरंडोल, (जिल्हा जळगाव):महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या वतीने एरंडोल तालुक्यातील सामाजिक व शेतकरी चळवळीत सातत्याने सक्रिय असणारे गुलाब पुंडलिक चौधरी यांची 'महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या एरंडोल तालुका कार्याध्यक्ष' पदी अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेचे संस्थापक, राष्ट्रीय अध्यक्ष तथा प्रख्यात शेतकरी नेते सुनील देवरे यांच्या हस्ते त्यांना हे नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
शेतकऱ्यांवर होणारे अन्याय थांबवण्यासाठी संघटित व्हा - सुनील देवरे..
यावेळी बोलताना राष्ट्रीय अध्यक्ष सुनील देवरे यांनी शेतकऱ्यांच्या विविध समस्यांवर भाष्य केले. ते म्हणाले की, सध्या शेतकरी वर्ग दुष्काळ, अतिवृष्टी, हमीभाव (MSP) आणि विविध नैसर्गिक संकटांमुळे अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्यांवरील होणारे अन्याय-अत्याचार थांबवण्यासाठी आणि त्यांचे हक्क मिळवण्यासाठी अन्नदात्यांनी एकाच छताखाली एकत्र येणे आणि संघटित होणे अत्यंत गरजेचे आहे.
एरंडोल तालुक्यात शेतकरी संघटनेचा विस्तार वाढवण्याचे निर्देश...
गुलाब चौधरी यांच्याकडे एरंडोल तालुक्यात संघटनेच्या जास्तीत जास्त शाखा सुरू करून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना संघटित करण्याची मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ही नियुक्ती एका वर्षाच्या कालावधीसाठी करण्यात आली असून, या निवडीमुळे एरंडोल तालुक्यात शेतकरी वर्गाकडून व विविध सामाजिक कार्यकर्त्यांकडून गुलाब चौधरी यांचे अभिनंदन होत आहे.
