आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशनची मोलाची साथ; पुण्याच्या चंद्रकांत अभंग यांच्यावर विनामूल्य यशस्वी अँजिओप्लास्टी

 हृदयात तीन ब्लॉकेज आणि चार लाखांचा खर्च; अध्यक्ष जितेंद्र पाटील यांच्या तत्परतेमुळे एकाही रुपयाशिवाय पार पडली शस्त्रक्रिया.
आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशनचे अध्यक्ष जितेंद्र पाटील यांच्या मदतीने यशस्वी अँजिओप्लास्टी झालेले रुग्ण चंद्रकांत अभंग.

एरंडोल (प्रतिनिधी) : आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशनच्या सामाजिक बांधिलकीमुळे आणि अध्यक्ष जितेंद्र पाटील यांच्या समयसूचकतेमुळे हडपसर (पुणे) येथील ३९ वर्षीय चंद्रकांत दत्तात्रय अभंग यांना अक्षरशः पुनर्जन्म लाभला आहे. आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची असतानाही, त्यांच्या हृदयातील तीन ब्लॉकेजवर एकही रुपया खर्च न करता यशस्वी अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे.


काही दिवसांपूर्वी चंद्रकांत अभंग यांना अचानक छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्या होत्या. त्यांनी तातडीने स्थानिक रुग्णालयात तपासणी केली असता, डॉक्टरांनी अँजिओग्राफी करण्याचा सल्ला दिला. या चाचणीत त्यांच्या हृदयात तीन मोठे ब्लॉकेज असल्याचे समोर आले. पुढील उपचारांसाठी त्यांना पुण्यातील भारती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथील तज्ज्ञ डॉक्टरांनी तातडीने बायपास शस्त्रक्रिया करणे गरजेचे असल्याचे सांगून, या उपचारासाठी सुमारे ४ ते ४.५ लाख रुपये खर्च येईल, असा अंदाज वर्तवला.


हातावर पोट असणाऱ्या अभंग कुटुंबासाठी एवढी मोठी रक्कम उभी करणे अशक्य होते. उपचारांच्या खर्चाच्या चिंतेने संपूर्ण कुटुंब हवालदिल झाले होते. या संकटाच्या काळात चंद्रकांत अभंग यांच्या बहिणीने ठाणे येथे नोकरीनिमित्त राहणाऱ्या आपल्या परिचितांशी संपर्क साधला. तेथील हेमंत पाटील यांनी त्यांना आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशनचे अध्यक्ष जितेंद्र पाटील यांची मदत घेण्याचा मोलाचा सल्ला दिला.


संपर्क साधताच जितेंद्र पाटील यांनी क्षणाचाही विलंब न लावता व्हॉट्सॲपद्वारे रुग्णाचे सर्व वैद्यकीय अहवाल मागवून घेतले. रिपोर्ट्सची पाहणी केल्यानंतर त्यांनी अभंग कुटुंबीयांना तात्काळ मुंबई परिसरात येण्यास सांगितले आणि ठाण्यातील एका नामांकित खासगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्याची सर्व व्यवस्था केली.


जितेंद्र पाटील यांनी स्वतः डॉक्टरांची भेट घेऊन रुग्णाची प्रकृती आणि उपचारांच्या पर्यायांवर सविस्तर चर्चा केली. त्यानंतर डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रकांत अभंग यांच्यावर बायपासऐवजी अँजिओप्लास्टी करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि ही शस्त्रक्रिया अत्यंत यशस्वीरीत्या पार पडली.


एकही रुपया न खर्चता मिळाले जीवनदान: या संपूर्ण वैद्यकीय उपचारांसाठी अभंग कुटुंबाला स्वतःच्या खिशातून एकही रुपया मोजावा लागला नाही, अशी भावना कुटुंबीयांनी व्यक्त केली.


आर्थिक विवंचनेमुळे दर्जेदार उपचारांपासून वंचित राहणाऱ्या सर्वसामान्य रुग्णांसाठी जितेंद्र पाटील आणि त्यांची संस्था देवदूत ठरत आहे. या अनमोल मदतीबद्दल अभंग कुटुंबीयांनी जितेंद्र पाटील यांचे भावूक होऊन आभार मानले.


“गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना वेळेत योग्य उपचार मिळवून देऊन त्यांचे प्राण वाचवणे, हेच आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशनचे मुख्य ध्येय आहे,” असे प्रतिपादन या निमित्ताने करण्यात आले.