प्रतिनिधी बातमीदार, महाराष्ट्र न्यूज वृत्तसेवा.
(Jalgaon / Erandol News / Khandesh)
जळगाव (Jalgaon News): मेंदूच्या आवरणाखाली रक्त साचून मेंदूवर तीव्र दबाव निर्माण झाल्याने गंभीर अवस्थेत असलेल्या ८० वर्षीय वृद्ध रुग्णावर जळगाव येथील महादेव सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये तातडीची व अतिजोखमीची मेंदू शस्त्रक्रिया (Brain Surgery) यशस्वीपणे पार पडली. विशेष बाब म्हणजे, शस्त्रक्रियेनंतर अवघ्या दुसऱ्या दिवशी रुग्ण शुद्धीवर आला आणि दोन दिवसांत त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता हा वृद्ध रुग्ण स्वतःच्या पायावर चालण्यासही सक्षम झाला आहे.
या ८० वर्षीय रुग्णाला अचानक शरीराच्या उजव्या बाजूला अशक्तपणा येणे, बोलता न येणे, सूचनांना प्रतिसाद न देणे तसेच स्वतःहून डोळे उघडता न येणे अशा गंभीर लक्षणांसह महादेव हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तातडीने करण्यात आलेल्या सीटी ब्रेन (CT Brain) तपासणीत रुग्णाला 'सबअॅक्यूट सबड्युरल हेमॅटोमा' (Subacute Subdural Hematoma) झाल्याचे स्पष्ट झाले. मेंदूच्या आवरणाखाली साचलेल्या रक्तामुळे मेंदूवर दबाव येऊन तो मधोमध सरकल्याचे निदान झाले.
रुग्णाची नाजूक व गंभीर प्रकृती लक्षात घेता वेळ न घालवता आपत्कालीन शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार एमसीएच न्यूरोसर्जन (MCh Neurosurgeon) डॉ. अनिकेत पाटील यांनी डाव्या बाजूला फ्रंटो-टेम्पोरो-पॅरिएटल डिकंप्रेसिव्ह क्रॅनिएक्टॉमी करून साचलेले रक्त यशस्वीरीत्या बाहेर काढले. या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेसाठी न्यूरोसर्जरी सिनिअर रेसिडेंट डॉ. श्रुती खंडागळे आणि जनरल सर्जरी रेसिडेंट डॉ. पोमेश यांनी सहकार्य केले, तर भूलतज्ज्ञ म्हणून डॉ. ब्रम्हाटे यांनी जबाबदारी सांभाळली.
शस्त्रक्रियेनंतर रुग्णाच्या प्रकृतीत अत्यंत वेगाने सुधारणा झाली. दुसऱ्याच दिवशी रुग्ण पूर्णपणे शुद्धीवर येऊन व्यवस्थित प्रतिसाद देऊ लागला आणि अवघ्या दोन दिवसांत प्रकृती स्थिर झाल्याने त्याला डिस्चार्ज देण्यात आला. सध्या रुग्ण स्वतः चालत असल्याचे पाहून समाधान व्यक्त केले जात आहे. महत्त्वाचे म्हणजे, या संपूर्ण महागड्या व अत्याधुनिक न्यूरोसर्जरीचा खर्च शासकीय योजनेअंतर्गत (Government Scheme) मोफत करण्यात आला. वेळेवर मिळालेले अचूक निदान, तज्ज्ञ डॉक्टरांची तत्परता आणि वैद्यकीय पथकाच्या समन्वयामुळे या ८० वर्षीय वृद्धाला नवे आयुष्य मिळाले आहे.
Jalgaon, Erandol,Khandesh आरोग्यसेवा अपडेट.
