एरंडोल (दि. ११ एप्रिल २०२७) – महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती शास्त्री इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, एरंडोल येथे अत्यंत उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांपासून प्राध्यापकांपर्यंत सर्वांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवून महात्मा फुले यांच्या कार्याला अभिवादन केले.
संस्थापक अध्यक्ष डॉ. विजय शास्त्री यांच्या प्रेरणेने तसेच संस्थापक सचिव सौ. रूपा शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी विभागप्रमुख प्रा. जावेद शेख यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी उपस्थितांनी उभे राहून त्यांना आदरांजली वाहिली. प्रा. जावेद शेख यांनी आपल्या भाषणात महात्मा फुले यांच्या शिक्षणविषयक धोरणांवर आणि सामाजिक सुधारणांमधील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानावर प्रकाश टाकला. त्यांनी विशेषतः स्त्रीशिक्षण, अस्पृश्यता निर्मूलन आणि दुर्बल घटकांसाठी केलेल्या कार्याचा उल्लेख करत विद्यार्थ्यांनी त्यांच्या विचारांचा अंगीकार करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाची प्रस्तावना प्रा. योगेश्वरी लोहार यांनी मांडली. त्यांनी महात्मा फुले यांच्या विचारांचे आधुनिक काळातील महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांना सामाजिक जबाबदारी पार पाडण्याचे आवाहन केले.
यावेळी प्रा. करण पावरा, प्रा. दिग्विजय पाटील आणि प्रा. चंद्रभान पाटील यांनीही मनोगत व्यक्त करत महात्मा फुले यांच्या कार्याचा गौरव केला. त्यांनी त्यांच्या विचारांची आजही समाजात तितकीच आवश्यकता असल्याचे नमूद केले.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा सहभाग विशेष उल्लेखनीय ठरला. विद्यार्थ्यांनी महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित भाषणे, विचार मांडणी आणि प्रेरणादायी प्रसंग सादर केले. या सादरीकरणातून सामाजिक जाणीव, समता आणि शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
कार्यक्रमाचे नियोजन प्रा. अनिता वळवी, प्रा. श्रद्धा शिवदे, प्रा. राहुल अहिरे, प्रा. गायत्री सूर्यवंशी आणि प्रा. रूपाली पाटील यांच्या संयुक्त प्रयत्नातून करण्यात आले. तसेच महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांनी महात्मा फुले यांच्या विचारांचा अंगीकार करून समतामूलक व प्रगत समाज निर्मितीसाठी कटिबद्ध राहण्याची शपथ घेतली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव वाढीस लागून राष्ट्रनिर्मितीच्या दिशेने सकारात्मक प्रेरणा मिळाली.

