धावत्या रेल्वेत पोलिसांचा 'कमांडो' स्टाईल थरार; चोपड्यातील त्या हत्येचा छडा २४ तासात.

चोपडा पोलीस आणि जळगाव एलसीबी पथक आरोपींसोबत.

चोपडा (जळगाव):पूर्व वैमनस्यातून तरुणाचा चेहरा ठेचून निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपींच्या जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) मुसक्या आवळल्या आहेत. गुन्ह्याची नोंद झाल्यानंतर अवघ्या २४ तासांच्या आत मुंबईहून पळून येणाऱ्या आरोपींना नाशिक ते चाळीसगाव दरम्यान धावत्या ट्रेनमध्ये अटक करण्यात आली.



नेमकी घटना काय?

चोपडा येथील तारामती नगरमधील रहिवासी प्रदीप राजेंद्र महाजन (३३) यांची १९ एप्रिलच्या रात्री निर्घृण हत्या करण्यात आली होती. चोपडा-धरणगाव रोडवरील पाटचारी जवळ अज्ञात हत्याराने चेहरा आणि डोके ठेचलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळला होता. या घटनेमुळे संपूर्ण चोपडा शहरात खळबळ उडाली होती.



पूर्व वैमनस्यातून रचला कट.

पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली असता, संशयीत आरोपी चेतन सुभाष कानडे याच्या सांगण्यावरून विजय भास्कर वैदकर आणि नर्मल संजय बडगुजर (दोघे रा. चोपडा) यांनी संगणमताने ही हत्या केल्याचे समोर आले. हत्येनंतर दोन्ही मुख्य आरोपी पसार झाले होते.


मुंबई ते नाशिक... आणि धावत्या रेल्वेत झडप!

आरोपी मुंबईत असल्याची माहिती जळगाव स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. लागलीच पोलिसांचे एक पथक मुंबईला रवाना झाले. मात्र, आरोपी मुंबईतून रेल्वेने जळगावच्या दिशेने निघाल्याची 'टीप' पोलिसांना मिळाली. कोणत्या ट्रेनमध्ये आरोपी आहेत हे ठाऊक नसतानाही, पोलिसांनी नाशिक स्टेशनवरून जळगावकडे येणाऱ्या सर्व ट्रेन्समध्ये शोधमोहीम राबवली. अखेर नाशिक ते चाळीसगाव दरम्यान पोलिसांनी त्यांना शिताफीने ताब्यात घेतले.



पोलिसांचा खाक्या दाखवताच दिली कबुली.

सुरुवातीला आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली नव्हती. मात्र, एलसीबी पथकाने आपला 'खाक्या' दाखवताच आणि विश्वासात घेऊन विचारपूस करताच त्यांनी जुन्या वादातून प्रदीप महाजन यांची हत्या केल्याची कबुली दिली.


तपासात सहभागी टीम.

ही धडाकेबाज कारवाई पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यात पोउनि सोपान गोरे, जितेंद्र वल्टे आणि त्यांच्या पथकासह चोपडा शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक पवन देसेले व त्यांच्या टीमचा मोलाचा वाटा आहे.


Q&A