“शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” या घोषणेचा विद्यार्थ्यांनी उत्साहात जयघोष केला.
एरंडोल /जळगाव प्रमोद चौधरी : रा. ति. काबरे विद्यालयात १४ एप्रिल २०२६ रोजी भारतरत्न Dr. B. R. Ambedkar यांची १३५वी जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी करण्यात आली.शाळेच्या प्रांगणात सकाळी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन आणि माल्यार्पणाने झाली.
यावेळी शाळेचे चेअरमन श्री. अनिलभाऊ बिर्ला, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद आणि विद्यार्थ्यांनी पुष्पगुच्छ अर्पण करून महामानवाला अभिवादन केले.कार्यक्रमात मुख्याध्यापक श्री. एस. एस. राठी सर यांनी अध्यक्षीय भाषण केले. तसेच उपमुख्याध्यापक श्री. पी. एच. नेटके सर यांनी बाबासाहेबांच्या जीवनावर प्रकाश टाकत त्यांच्या कार्याची माहिती दिली. पर्यवेक्षक श्री. पी. एस. नारखेडे सर यांनी बाबासाहेबांच्या सामाजिक न्याय, शिक्षण, समता आणि संविधान निर्मितीतील योगदानावर सविस्तर भाष्य केले.
मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ दलित मुक्तिदाते नव्हते, तर संपूर्ण भारताच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय समतेचे प्रणेते होते. त्यांच्या विचारांचे पालन करणे हेच त्यांना खरी श्रद्धांजली आहे.”
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक श्री. व्हि. एस. काळे सर यांनी केले.तसेच, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात शाळेच्या वतीने चेअरमन, मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व काही पालकांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.
