नगरसेविका भारती गुजर व पौर्णिमा देवरे यांच्या उपस्थितीत प्रभाग ८ मध्ये फवारणी मोहीम.



नागरिकांच्या आरोग्यासाठी नगरपरिषद सज्ज.

एरंडोल (प्रतिनिधी): शहरात वाढत्या उष्णतेमुळे डासजन्य आजारांचा धोका लक्षात घेऊन एरंडोल नगरपरिषदेकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सर्व प्रभागांमध्ये फवारणी मोहीम राबविण्यात येत आहे.या मोहिमेअंतर्गत आज प्रभाग क्रमांक 8 मध्ये व्यापक स्वरूपात फवारणी करण्यात आली.



या मोहिमे दरम्यान नगरसेविका सौ.भारती गुजर व सौ. पौर्णिमा देवरे यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून फवारणी मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदविला. त्यांनी स्वच्छता विभागाच्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधत परिसरातील स्वच्छतेबाबत सूचना दिल्या. तसेच काही भागांमध्ये अधिक फवारणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. 



नगरपरिषद प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील सर्व प्रभागांमध्ये टप्प्याटप्प्याने ही मोहीम राबविण्यात येणार असून डेंग्यू, मलेरिया,टायफाईड यांसारख्या आजारांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासाठी विशेष औषधांचा वापर करण्यात येत असून आरोग्य विभागाच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण मोहीम पार पाडली जात आहे.



नगरसेविका भारती गुजर व पौर्णिमा देवरे यांनी नागरिकांशी संवाद साधत परिसर स्वच्छ ठेवण्याचे, साचलेले पाणी त्वरित काढून टाकण्याचे आणि कचरा व्यवस्थापनाबाबत दक्षता घेण्याचे आवाहन केले. “स्वच्छता हीच खरी प्रतिबंधात्मक उपाययोजना आहे. नागरिकांच्या सहकार्याशिवाय कोणतीही मोहीम यशस्वी होऊ शकत नाही,” असे त्यांनी नमूद केले.



दरम्यान, नगरपरिषदेकडून नागरिकांना घरासमोर किंवा परिसरात पाणी साचू न देणे, कचरा वेळेवर टाकणे आणि स्वच्छता राखणे याबाबत वारंवार सूचना करण्यात येत आहेत. नागरिकांनीही प्रशासनाच्या या उपक्रमास सकारात्मक प्रतिसाद देत सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.