“डॉक्टर हे देवाचे रूप असतात, असे म्हणतात ते खरे आहे. श्री स्वामी समर्थांच्या कृपेने डॉक्टर देवदूत बनून आले आणि माझा जीव वाचला. महादेव हॉस्पिटलमधील सर्व डॉक्टरांचे मी मनापासून आभार मानतो.”....निलकंठ वाणी.
जळगाव : सकाळची वेळ… अंगातून घामाच्या धारा, छातीत असह्य वेदना आणि खांद्यात तीव्र दुखणे… एका फोन कॉलमधून मदतीसाठी आलेला हा आवाज प्रत्यक्षात मृत्यूशी सुरू असलेल्या झुंजीचा होता. मात्र योग्य वेळी घेतलेला निर्णय, डॉक्टरांची तत्परता आणि महादेव हॉस्पिटलच्या सज्जतेमुळे एका संपादकाला अक्षरशः नवजीवन मिळाले.
जळगावातील महादेव हॉस्पिटल येथे आयोजित हृदयविकार तपासणी शिबिरादरम्यान हा थरारक प्रकार घडला. सकाळी सुमारे ८.३० वाजता जनसंपर्क अधिकारी राहुल कुलकर्णी यांच्या मोबाईलवर संपादक निलकंठ वाणी यांचा फोन आला. फोनवर बोलताना त्यांचा आवाज घाबरलेला होता. अंगातून प्रचंड घाम येत होता, तर छाती आणि खांद्यात असह्य वेदना सुरू होत्या.
क्षणाचाही विलंब न करता राहुल कुलकर्णी यांनी ही गंभीर हृदयविकाराची लक्षणे असल्याचे ओळखले आणि तातडीने महादेव हॉस्पिटलमध्ये येण्याचा सल्ला दिला. त्याचवेळी रुग्णालयाचे प्रशासक एन. जी. चौधरी यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत संपूर्ण वैद्यकीय यंत्रणा सज्ज ठेवली.
रुग्ण हॉस्पिटलमध्ये पोहोचताच हृदयरोगतज्ज्ञ डॉ. सिद्धेश खांदे यांनी तातडीने ईसीजी तपासणी केली. अहवालात गंभीर हृदयविकाराचा झटका आल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्वरित उपचार सुरू करण्यात आले. रक्तदाब नियंत्रणात आल्यानंतर अँजिओग्राफी करण्यात आली. या तपासणीत हृदयातील मुख्य रक्तवाहिनी तब्बल ९९ टक्के ब्लॉक असल्याचे समोर आले.
परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याने डॉक्टरांनी वेळ न दवडता तातडीने अँजिओप्लास्टी केली. यशस्वी शस्त्रक्रियेनंतर रुग्णाचा जीव वाचवण्यात डॉक्टरांना यश आले. विशेष म्हणजे, उपचाराच्या वेळी रुग्णाच्या खिशात एक रुपयाही नव्हता. मात्र शासन योजनेचा लाभ मिळवून देत संपूर्ण उपचार मोफत करण्यात आले.
याबाबत माहिती देताना हृदयरोगतज्ज्ञ डॉ. सिद्धेश खांदे म्हणाले, “रुग्णाला वेळेत हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले, हीच सर्वात महत्त्वाची बाब ठरली. छातीत वेदना, जास्त घाम येणे आणि खांद्यात दुखणे ही हृदयविकाराच्या झटक्याची गंभीर लक्षणे आहेत. ईसीजीमध्ये गंभीर हृदयविकाराचा झटका स्पष्ट झाला होता.अँजि ओग्राफी मध्ये मुख्य रक्तवाहिनी ९९ टक्के ब्लॉक असल्याचे दिसून आले. तातडीने अँजिओप्लास्टी करून रक्तपुरवठा सुरळीत करण्यात आला. योग्य वेळी उपचार मिळाल्यामुळे मोठा अनर्थ टळला.”
