एरंडोल : अखिल भारतीय औषध विक्रेता संघाच्या देशव्यापी एकदिवसीय बंदच्या आवाहनाला एरंडोल मेडिकल असोसिएशनने पाठिंबा दर्शवला असून, बुधवार दि. 20 मे 2026 रोजी शहरातील औषधांची दुकाने बंद राहणार आहेत. ऑनलाइन औषध विक्रीला विरोध, कॉर्पोरेट कंपन्यांकडून दिल्या जाणाऱ्या व्यावसायिक सवलती बंद करणे तसेच बनावट औषधांवर कठोर कारवाई करणे आदी मागण्यांसाठी हा बंद पुकारण्यात आला आहे.
या आंदोलनात एरंडोल मेडिकल असोसिएशनचा सक्रिय सहभाग राहणार असल्याची माहिती अध्यक्ष सतीश पाटील आणि जिल्हा प्रतिनिधी कैलास न्याती यांनी दिली. औषध दुकाने बंद राहणार असल्याने नागरिकांची काही प्रमाणात गैरसोय होऊ शकते, त्यामुळे सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
यासंदर्भातील निवेदन प्रशासनाला देण्यात येणार असून, “हा आमच्या न्याय व हक्कासाठीचा एकदिवसीय लढा आहे,” अशी भूमिका असोसिएशनने स्पष्ट केली आहे.
हा बंद यशस्वी करण्यासाठी असोसिएशनचे उपाध्यक्ष उदय पाटील, सचिव गुणवंत पाटील, सहसचिव ललित पाटील, खजिनदार योगेश बियाणी तसेच सदस्य मनोहर पाटील, महेश पाटील, प्रवीण शिरोडे, चेतन पाटील, अरविंद पाटील, सागर पाटील, कमलेश चौधरी, संदीप पाटील, निखिल काबरा आदी केमिस्ट बांधवांनी पुढाकार घेतला आहे.
