मुसळधार पावसामुळे धरणातील जलसाठ्यात झपाट्याने वाढ; प्रशासनाला दक्ष राहण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश.
एरंडोल, प्रतिनिधी :- जळगाव जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे एरंडोल तालुक्यातील अंजनी मध्यम प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक वाढली आहे. धरणातील जलसाठा झपाट्याने वाढत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून शनिवारी धरणातून सुमारे ४५०० क्युसेक्स पाण्याचा नियंत्रित विसर्ग नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे.
राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या निर्देशानुसार हा विसर्ग करण्यात येत असून, नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत नदीपात्रात उतरू नये, पूर पाहण्यासाठी किंवा छायाचित्रणासाठी नदीकाठावर गर्दी करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
«"नदीकाठच्या सर्व नागरिकांनी अत्यंत सतर्क राहून प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे. जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी नदीपात्रात जाणे टाळावे आणि कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास तात्काळ स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा."
— गुलाबराव पाटील, पालकमंत्री, जळगाव जिल्हा»
नदीकाठच्या शेतकऱ्यांनी आपल्या गुरेढोरे, पशुधन, मोटारपंप, कृषी अवजारे तसेच इतर मौल्यवान साहित्य सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. तसेच नदीपात्रालगत सुरू असलेली विविध विभागांची बांधकामे, यंत्रसामग्री व साहित्य तातडीने सुरक्षित स्थळी हलविण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत. सर्व शासकीय यंत्रणांनी परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असेही निर्देश देण्यात आले आहेत.
«"धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसाची तीव्रता आणि पाण्याची आवक लक्षात घेऊन आवश्यकतेनुसार विसर्गात वाढ किंवा घट करण्यात येईल. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांवरच विश्वास ठेवावा."
— विनोद पाटील, कार्यकारी अभियंता, गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव»
