धार्मिक वातावरणात भक्तिभावाने सोहळा; ६५० भाविकांची उपस्थिती.
चोपडा | प्रतिनिधी : युवराज चौधरी
चोपडा शहरातील ब्राह्मणवाडी येथे ‘हर हर महादेव’ आणि ‘ॐ नमः शिवाय’च्या जयघोषात बेलेश्वर महादेवाच्या मूर्तीची भव्य स्थापना करण्यात आली. यानिमित्ताने परिसरात दिवसभर भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
ओम नगर येथील ओंकारेश्वर महादेव मंदिरापासून बेलेश्वर महादेवाच्या मूर्तीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशे, टाळ-मृदंग, भजन, गायन आणि नृत्याच्या गजरात ही मिरवणूक ब्राह्मणवाडी येथे पोहोचली. त्यानंतर विधिवत पूजा, मंत्रजप व अभिषेक करून मूर्तीची स्थापना करण्यात आली.
पुजारी सचिन शुक्ला महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत धार्मिक विधी व अभिषेक पार पडला. भरत पाटील, किरण भोई, सुभाष सोनवणे व हेमंत भिडे यांच्या हस्ते सपत्नीक पूजन करण्यात आले. सायंकाळी ७ वाजता महाआरती झाल्यानंतर भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
या सोहळ्यात ब्राह्मणवाडी, पुंडलिक नगर, गजानन सिटी, साई सिद्धी पार्क व विमल विहार परिसरातील सुमारे ६५० भाविक सहभागी झाले. ब्राह्मणवाडीतील मुलींनी साकारलेल्या आकर्षक रांगोळीने भाविकांचे विशेष लक्ष वेधून घेतले, तर महिलांनी भजनसंध्येचा कार्यक्रम सादर केला.
महादेवाची पिंड, नंदी, कासव तसेच मंदिराच्या बांधकामासाठी विनोद चौधरी (पप्पुदादा) व योगेश मराठे (पिंटू भाऊ) यांनी स्वखर्चाने योगदान देत अहोरात्र परिश्रम घेतले. घंटेसाठी नंदलाल भिडे, नागराज भगवान यांच्यासाठी प्रकाश भोई, तसेच पाण्याच्या जलधारेसाठी अजय सोनवणे यांनी सहकार्य केले. शिवा कुमार (यू.पी.वाले) यांनी भरीव देणगी दिली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी निलेश पाटील, ज्ञानेश्वर पाटील (दादू), गणेश पाटील, नाना चौधरी, योगेश कोळी, सुनील सैंदाणे, दीपक बाविस्कर, दिलीप पाळधी, रोहित शिंदे व राजेंद्र बारी यांनी विशेष परिश्रम घेतले. महाप्रसादासाठी अन्नदान ईश्वर नागराज भोई यांच्याकडून करण्यात आले.
या आध्यात्मिक सोहळ्याचे आयोजन गंगामाई बहुउद्देशीय महिला मंडळ, चोपडा यांच्या वतीने करण्यात आले. श्रद्धा, भक्ती आणि एकतेच्या भावनेतून झालेली ही स्थापना ब्राह्मणवाडीतील ऐतिहासिक व मंगलमय क्षण ठरल्याची भावना उपस्थित भाविकांनी व्यक्त केली.
(सदर आलेली बातमी ही युवराज चौधरी यांच्या मार्फत वॉट्सअप देण्यात आले होती.)वा.प्र.
