मातीपासून गणपती घडविताना पर्यावरण संवर्धनाचा धडा.

एरंडोलमध्ये शाडू माती गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद; १०० हून अधिक विद्यार्थी व नागरिकांचा सहभाग.

मातीपासून गणपती घडविताना पर्यावरण संवर्धनाचा धडा


एरंडोल | प्रतिनिधी : गणेशोत्सवाला भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाची जोड असली तरी त्यासोबत पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण होणेही तितकेच गरजेचे आहे. याच उद्देशाने एरंडोल नगरपरिषदेच्या वतीने ‘पर्यावरणपूरक गणेशोत्सव’ या संकल्पनेतून शाडू मातीपासून गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. दि. ९ सप्टेंबर २०२६ रोजी कर्मवीर अभ्यासिका, नगरपरिषद एरंडोल येथे झालेल्या या कार्यशाळेला १०० हून अधिक विद्यार्थी व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.



कार्यशाळेदरम्यान मुख्याधिकारी श्री. अमोल बागुल यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे महत्त्व स्पष्ट केले. शाडू मातीच्या गणेशमूर्तींचे पर्यावरणीय फायदे, विसर्जनामुळे होणारे जलप्रदूषण आणि पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी नागरिकांनी घ्यावयाची काळजी याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.


विशेष म्हणजे, मुख्याधिकारी अमोल बागुल यांनी स्वतः शाडू मातीपासून गणेशमूर्ती साकारत विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला. तसेच नगरसेवक व नगरसेविकांनीही कार्यशाळेत प्रत्यक्ष सहभागी होत गणेशमूर्ती तयार केल्या. लोकप्रतिनिधी, विद्यार्थी आणि नागरिकांनी एकत्रितपणे मूर्ती साकारल्याने कार्यशाळेला उत्साहाचे वातावरण लाभले.


१५ विद्यार्थ्यांचा ट्रॉफी देऊन सन्मान


कार्यशाळेत सहभागी विद्यार्थ्यांमधून उत्कृष्ट गणेशमूर्ती साकारणाऱ्या १५ विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देतानाच पर्यावरण संवर्धनाची जाणीव त्यांच्या मनात रुजविण्याचा प्रयत्न करण्यात आला.


या उपक्रमात नगराध्यक्ष डॉ. नरेंद्र ठाकूर, उपनगराध्यक्ष श्री. कृष्णा ओतारी, नगरसेवक श्री. मनोजभाऊ पाटील, श्री. आनंदभाऊ दाभाडे, श्री. रविंद्र महाजन तसेच नगरसेविका श्रीमती सत्यभामाबाई पाटील, श्रीमती मणकरनाबाई चौधरी, सौ. भारती गुजर व सौ. शारदा मराठे यांनी सहभाग नोंदविला.


‘शाडू मातीचा गणपती घडवूया, जलप्रदूषण टाळूया आणि पर्यावरणाचे रक्षण करूया’ हा पर्यावरणपूरक संदेश या कार्यशाळेतून देण्यात आला. नगरपरिषदेच्या या उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक होत असून, पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या दिशेने एरंडोल शहराने सकारात्मक पाऊल टाकले आहे.


कार्यशाळेच्या आयोजनासाठी नगरपरिषदेचे कार्यालयीन अधिकारी श्री. एस. आर. ठाकूर, श्री. सुमित उमराने, श्री. हितेश जोगी, श्री. जीवन जाधव, श्री. विवेक कोळी व श्री. महेश विसपुते यांचे सहकार्य लाभले.