एरंडोल : शेतकऱ्यांचा सर्जा-राजाचा कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण म्हणजे बैलपोळा. सणाच्या आनंदात केवळ सण साजरा न करता सामाजिक प्रश्नांवर भाष्य करण्याची परंपरा येथील शेतकरी प्रल्हाद पितांबर महाजन यांनी यंदाही कायम ठेवली.
महाजन यांनी यावर्षी बैलांची अनोख्या पद्धतीने सजावट करून बैलपोळा साजरा केला. बैलांच्या पाठीवरील झुलींवर विविध सामाजिक व शैक्षणिक विषयांचे संदेशचित्र रेखाटण्यात आले होते. विशेषतः नीट (NEET) आणि टीईटी पेपरफुटी प्रकरण, तसेच लहान मुलांच्या हातातील मोबाईलचे वाढते प्रमाण आणि त्यातून निर्माण होणारे मानसिक आरोग्याचे प्रश्न याकडे त्यांनी लक्ष वेधले.
गेल्या सुमारे १० वर्षांपासून बैलांच्या झुलींवर सामाजिक व शैक्षणिक संदेश मांडण्याची परंपरा महाजन यांनी सुरू ठेवली आहे. यंदाही विविध विषयांवर प्रकाश टाकत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
कुंभमेळ्यासाठी कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करण्याऐवजी जिल्हा परिषद शाळांवर खर्च करावा, ग्रामीण भागातील बंद पडलेल्या शाळा पुन्हा सुरू कराव्यात, तसेच तालुक्यातील बंद पडलेला वसंत सहकारी साखर कारखाना त्वरित सुरू करण्यात यावा, अशा मागण्या त्यांनी केल्या आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून पावसाने मारलेली दडी आणि तालुक्यावर ओढवलेले दुष्काळसदृश संकट यामुळे शेतकऱ्यांच्या हिताच्या व जिव्हाळ्याच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
शेतात राबणाऱ्या बैलांची यथासांग पूजा करून पुरणपोळीचा नैवेद्य दाखवत बैलपोळ्याचा उत्साह साजरा करण्यात आला. मात्र, पावसाअभावी कोमेजलेल्या पिकांकडे पाहताना बळीराजाच्या चेहऱ्यावर दुष्काळाची चिंता स्पष्ट दिसत होती. चिमुकल्यांनी बैलपोळ्याचा आनंद घेतला असला, तरी पावसाअभावी दरवर्षीच्या उत्साहावर काही प्रमाणात विरजण पडल्याचे चित्र दिसून आले.
