२८ सप्टेंबरला शासकीय कार्यालयांत ‘माहिती अधिकार दिन’ साजरा करा.

२८ सप्टेंबरला शासकीय कार्यालयांत ‘माहिती अधिकार दिन’ साजरा करा.

एरंडोल : तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये २८ सप्टेंबर २०२६ रोजी ‘माहिती अधिकार दिन’ साजरा करून नागरिकांमध्ये जनजागृती करणारे विविध कार्यक्रम आयोजित करावेत, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनच्या एरंडोल शाखेने केली आहे. याबाबतचे निवेदन उपविभागीय अधिकारी मनीषकुमार गायकवाड यांना देण्यात आले.


माहितीचा अधिकार अधिनियम २००५ संदर्भात नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती निर्माण व्हावी, कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन मिळावे आणि नागरिकांना माहितीचा अधिकार सहजपणे वापरता यावा, यासाठी विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली.


तसेच, शासकीय कार्यालयांच्या दर्शनी भागात माहिती अधिकार कायदा, अर्ज करण्याची प्रक्रिया, आवश्यक माहिती व नागरिकांच्या अधिकारांबाबत जनजागृती करणारे फलक लावण्यात यावेत, अशी मागणीही करण्यात आली.


यावेळी माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनचे तालुकाध्यक्ष सिताराम आनंदा मराठे, संघटक विज्ञान बुधा पाटील, कार्यकारिणी सदस्य राजधर संतोष महाजन आणि तालुका उपाध्यक्ष तुषार सुभाष शिंपी उपस्थित होते.