जळगाव (विशेष प्रतिनिधी): जळगाव तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांनी खरीप हंगाम २०२६-२७ साठी 'ई-पीक पाहणी'ची नोंद तसेच 'ॲग्री स्टॅक' (Agri Stack) अंतर्गत आपली नोंदणी करून 'फार्मर आयडी' (Farmer ID) तात्काळ व अचूक पद्धतीने तयार करून घ्यावा, असे आवाहन जळगावच्या तहसीलदारांनी केले आहे. तालुक्यातील एकही शेतकरी शासकीय योजनांच्या लाभापासून व पीक पाहणीच्या नोंदणीपासून वंचित राहू नये, यासाठी हे काम वेळेत पूर्ण करणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
"ई-पीक पाहणी आणि ॲग्री स्टॅक अंतर्गत मिळणारा 'फार्मर आयडी' ही शेतकऱ्यांच्या पिकाची अधिकृत नोंद म्हणून अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. यामुळे विविध शासकीय योजना, पीक विमा आणि अनुदानाचा लाभ मिळणे सोपे होईल. त्यामुळे जळगाव तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्याने स्वतःहून पुढाकार घेऊन ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी."
— तहसीलदार, जळगाव
अशी करा नोंदणी प्रक्रिया...
* ॲप डाऊनलोड करा: सर्वप्रथम Google Play Store वरून DCS (MH) किंवा ई-पीक पाहणी मोबाईल ॲप डाऊनलोड करून शेतकरी म्हणून नोंदणी करावी.
* फार्मर आयडी व ओटीपी: ॲपमध्ये भाषा निवडून शेतकरी म्हणून लॉगिन करा. आपला फार्मर आयडी (Farmer ID) प्रविष्ट करा. प्राप्त झालेला ओटीपी (OTP) टाकून व्हेरिफाय करा आणि ४ अंकी पिन सेट करा.
* माहिती भरा व खाते निवडा: खाते क्रमांक, भूमापन क्रमांक किंवा गट क्रमांक, क्षेत्र आणि खरीप २०२६-२७ हंगाम निवडा.
* पिकाची नोंद व छायाचित्र: प्रत्यक्ष शेतात जाऊन पिकाचे नाव, वान, पेरणीची तारीख, सिंचनाचा प्रकार इत्यादी अचूक माहिती भरा. त्यानंतर पिकाचे तीन स्पष्ट फोटो ॲपद्वारे काढून अपलोड करा व माहिती जतन (Save) करा.
महत्त्वाची टीप: फोटो अपलोड करताना व नोंद सादर करताना मोबाईलमधील जीपीएस (GPS/Location) व इंटरनेट सुविधा सुरू ठेवणे अनिवार्य आहे.
त्रुटी दुरुस्तीची सोय:
नोंद सादर करण्यापूर्वी सर्व माहिती अचूक असल्याची खात्री करावी. नोंदणीमध्ये काही चूक झाल्यास अथवा दुरुस्ती करायची असल्यास ४८ तासांच्या आत दुरुस्ती करणे किंवा नोंद रद्द करण्याची सुविधा ॲपमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे.
