एरंडोलमध्ये गणेश विसर्जन मिरवणूक उत्साहात अन् शांततेत पार; रंगीबेरंगी कागदी पाकळ्यांचा वर्षाव ठरला आकर्षण.

एरंडोल गणेश विसर्जन मिरवणूक.. 2026
Batmidar jalgaon news


एरंडोल : शहरासह ग्रामीण भागातील हजारो भाविकांच्या उपस्थितीत एरंडोल शहरातील गणेश विसर्जन मिरवणूक उत्साहपूर्ण वातावरणात आणि शांततेत पार पडली. दुपारी चार वाजता प्रमुख सार्वजनिक गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. पहाटे पाच वाजता शेवटच्या गणपतीचे विसर्जन करण्यात आले.


सकाळपासूनच शहरातील लहान गणेश मंडळांनी मिरवणुका काढून विधिवत पूजा-अर्चा करत गणेशमूर्तींचे विसर्जन केले. पांडववाडा मित्र मंडळ आणि मरीमाता चौक मित्र गणेश मंडळ यांसह विविध मंडळांनी सकाळच्या सत्रात विसर्जन केले.


दुपारच्या मुख्य मिरवणुकीत हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेला जयगुरू व्यायामशाळेचा गणपती अग्रभागी होता. चौक गणेश मंडळ, श्री सावता माळी व्यायामशाळा, बालवीर गणेश मंडळ, बालमित्र गणेश मंडळ, नम्रता गणेश मंडळ, माहेश्वरी नवयुवक मंडळ, अखिल ब्रह्मवृंद युवक मंडळ, ज्ञानदीप मित्र मंडळ, सर्वोदय मित्र मंडळ, बालाजी मित्र मंडळ, छत्रपती शिवाजी महाराज मित्र मंडळ, संताजी मित्र मंडळ, जयहिंद व्यायामशाळा, जय बजरंग मित्र मंडळ, हरीपुरी युवक गणेश मंडळ आणि नागराज मित्र मंडळ आदी प्रमुख मंडळे मिरवणुकीत सहभागी झाली.


मिरवणुकीत महिला, युवकांसह शहर व ग्रामीण भागातील हजारो भाविक सहभागी झाले होते. विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते शिस्तबद्ध पद्धतीने लेझीम खेळत होते. नम्रता गणेश मंडळातील आदिवासी युवकांचे पारंपरिक नृत्य मिरवणुकीचे विशेष आकर्षण ठरले.


यंदाच्या मिरवणुकीत गुलालाचा तुलनेने कमी वापर करून विविध रंगांच्या कागदी व चमकीच्या पाकळ्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला. त्यामुळे मिरवणुकीला आकर्षक स्वरूप प्राप्त झाले. विविध राष्ट्रीय महापुरुषांची छायाचित्रे असलेले फलक, घोषवाक्यांचे फलक आणि भगवे ध्वज घेऊन मंडळांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.


नागोबा मढी येथे अनोखे स्वागत

नागोबा मढी परिसरात श्री सावता माळी गणेश मंडळाचा गणपती पोहोचल्यानंतर नागराज गणेश मंडळाच्या वतीने करण्यात आलेले स्वागत विशेष आकर्षण ठरले. हा प्रसंग पाहण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. गांधीपुरा भागातील जयहिंद चौकात आकर्षक रोषणाईने गणपतीचे स्वागत करण्यात आले. तसेच होळी मैदान येथे जयहिंद गणेश मंडळाच्या गणपतीचे छत्रपती शिवाजी महाराज गणेश मंडळाच्या वतीने स्वागत करण्यात आले.


मिरवणुकीदरम्यान वीजपुरवठा सुरळीत राहावा आणि कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी वीज वितरण कंपनीच्या वतीने विशेष दक्षता घेण्यात आली. प्रमुख ठिकाणी भाविक तसेच सामाजिक व राजकीय संघटनांच्या वतीने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.


नगरपालिका कार्यालयाजवळ नगरपालिकेच्या वतीने गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी मनीषकुमार गायकवाड, तहसीलदार गोपाल पाटील, पोलीस निरीक्षक सुनील पवार, माजी नगराध्यक्ष देविदास महाजन, किशोर निंबाळकर, निवृत्त तहसीलदार अरुण माळी आणि उपनगराध्यक्ष कृष्णा ओतारी यांच्या हस्ते मंडळांच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. गणेशमूर्तींना पुष्पहार अर्पण करण्यात आले.


नगरपालिकेच्या वतीने शहरातील विविध ठिकाणी गणेशमूर्ती व निर्माल्य संकलनाची व्यवस्था करण्यात आली होती. बाखरूम बाबा मशिदीजवळ पत्रकार जावेद मुजावर आणि माजी उपनगराध्यक्ष जाहिरोद्दीन शेख कासम यांनी गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांचे व गणेशमूर्तींचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.


दरम्यान, सुमारे २० ते २५ फूट उंचीच्या गणेशमूर्ती मिरवणुकीतून नेताना मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना मोठी कसरत करावी लागली.


अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्यासह पोलीस कर्मचारी, गृहरक्षक दलाचे जवान, महसूल व नगरपालिका कर्मचारी, शांतता समितीचे सदस्य तसेच विविध राजकीय व सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य केले. किरकोळ वादविवाद वगळता संपूर्ण विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडली.