![]() |
| Batmidar Jalgaon News Erandol. |
एरंडोल : बदलत्या आर्थिक आणि तंत्रज्ञानाच्या युगात वाणिज्य व उद्योग क्षेत्रात रोजगारासह उद्योजकतेच्या अनेक नव्या संधी निर्माण होत असून विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानासोबत आवश्यक कौशल्ये आत्मसात करावीत, असे प्रतिपादन कार्यशाळेतील मान्यवरांनी केले.
दादासाहेब दिगंबर शंकर पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, एरंडोल येथील वाणिज्य विभागाच्या वतीने वाणिज्य मंडळाच्या उद्घाटनानिमित्त ‘वाणिज्य व उद्योगाच्या संधी’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटन यशवंतराव चव्हाण शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अमितदादा पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी वाणिज्य क्षेत्राचे देशाच्या अर्थव्यवस्थेतील महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांनी ग्राहकांच्या गरजा ओळखून आधुनिक संसाधने व तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करीत उद्योग-व्यवसाय उभारण्याच्या दिशेने प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. जे. पाटील यांनी बदलत्या काळानुसार विद्यार्थ्यांनी आधुनिक कार्यपद्धती आणि आवश्यक कौशल्यांचा विकास करून उपलब्ध करिअर संधींचा लाभ घ्यावा, असे सांगितले. उपप्राचार्य डॉ. ए. ए. बडगुजर यांनी व्यवसाय करताना नैतिक मूल्यांचे पालन करण्यासोबतच गुणवत्तापूर्ण वस्तू व सेवांच्या निर्मितीवर भर देण्याचे महत्त्व स्पष्ट केले.
कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक डॉ. सुरेश जी. पाटील कॉलेज, चोपडा येथील वाणिज्य विभागप्रमुख प्रा. डॉ. चंद्रकांत देवरे यांनी डिजिटल तंत्रज्ञान, वित्तीय सेवा, ई-कॉमर्स आणि स्टार्टअप क्षेत्रातील वाढत्या संधींबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कौशल्यविकास, बदलत्या बाजारपेठेचा अभ्यास आणि तंत्रज्ञानाचा योग्य वापर यामुळे विद्यार्थ्यांना रोजगार तसेच उद्योजकतेच्या क्षेत्रात पुढे जाण्यास मदत होऊ शकते, असे त्यांनी नमूद केले.
यावेळी के. डी. पाटील इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य यांनी विद्यार्थ्यांना यशस्वी करिअरसाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मान्यवरांचा परिचय वाणिज्य विभागप्रमुख प्रा. डॉ. संदीप कोतकर यांनी करून दिला. उर्मिला भिकन बैरागी, प्राची गोपाल बडगुजर व हर्षदा विनोद ठाकरे यांनी ईशस्तवन व स्वागतगीत सादर केले. सूत्रसंचालन साक्षी मोराणकर व चैताली पाटील यांनी केले.
यावेळी अर्थशास्त्र विभागाचे प्रा. विजय गाढे उपस्थित होते. कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. डॉ. अतुल पाटील व प्रा. योगेश पाटील यांनी परिश्रम घेतले.
