कवी पी. जी. चौधरी यांच्या ‘चाहूल’ काव्यसंग्रहाचे उत्साहात प्रकाशन.
एरंडोल, दि. १९ सप्टेंबर २०२६ :
“जगाच्या कोलाहलात मनाला लाभलेली शांत जागा म्हणजे कविता. कविता जन्माला आली नसती, तर सृष्टी, दृष्टी आणि मानवी जगणे भकास झाले असते. कवितेने माणसाला माणूस केले आणि त्याच्या जगण्याला मोल दिले,” असे प्रतिपादन कवी प्रा. वा. ना. आंधळे यांनी केले.
कमलनाम साहित्य मंच, एरंडोल यांच्या वतीने कवी पी. जी. चौधरी यांच्या ‘चाहूल’ या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा उत्साहपूर्ण आणि साहित्यिक वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून प्रा. आंधळे बोलत होते.
यावेळी खान्देशातील सुप्रसिद्ध नाट्यकर्मी तथा ‘आयतं पोयतं सख्यानं’ या एकपात्री प्रयोगाचे सादरकर्ते प्रवीण महाजन (शिरपूर) आणि नाशिक येथील विजय भागवत महाजन यांच्या हस्ते ‘चाहूल’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.
कार्यक्रमास माजी जिल्हा परिषद सदस्य नानाभाऊ महाजन, डायटचे प्राचार्य राजेंद्र महाजन, कवी निंबा पुना बडगुजर, प्रकाश श्रीराम माळी (तळोदा), रावसाहेब अरुणकुमार माळी, नथ्थू काशिनाथ पिंपरे यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती.
कवी पी. जी. चौधरी यांनी आपल्या मनोगतातून काव्यनिर्मितीमागील प्रेरणा आणि आपल्या काव्यलेखनाचा प्रवास याबाबत सविस्तर मनोगत व्यक्त केले. प्रमुख अतिथींनीही कवी चौधरी यांच्या काव्यलेखनातील सौंदर्य, सहजता आणि सामाजिक आशयाचे कौतुक केले.
कमलनाम साहित्य मंचचे संचालक तथा युवा कवी प्रग्नेश झाम्बरे यांनी कवी पी. जी. चौधरी यांच्या व्यक्तिमत्त्वावर सादर केलेली कविता विशेष आकर्षण ठरली. उपस्थित अतिथींचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
अध्यक्षीय भाषणात प्रा. वा. ना. आंधळे यांनी पुढे सांगितले की, “कवी पी. जी. चौधरी यांनी आपल्या सृजनातून भवतालातील विविध विषयांना योग्य न्याय दिला आहे. त्यांच्या लेखनातील सहजता हेच त्यांच्या साहित्याचे सौंदर्यस्थळ आहे.” यावेळी त्यांनी चौधरी यांच्या विविध कवितांचे संदर्भ देत त्यांच्या काव्यलेखनाचे वैशिष्ट्य समजून सांगितले.
या साहित्यिक सोहळ्यास सूर्योदय ज्येष्ठ नागरिक संघ, एरंडोलचे सदस्य, नगर वाचनालयाचे अध्यक्ष जगदीश ठाकूर, माजी सैनिक रघुनाथ सुतार, माजी सैनिक ठाकूर, पी. जी. चौधरी सरांचे माजी विद्यार्थी तसेच जळगाव, धुळे, नाशिक, शिरपूर, तळोदा, मुंबई, बदलापूर येथील साहित्यप्रेमींसह एरंडोल शहरातील ज्येष्ठ रसिकांची मोठी उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. हेमंत चौधरी यांनी केले. काव्यमय आणि बहारदार सूत्रसंचालन आदर्श शिक्षिका सौ. क्षमा साळी यांनी केले, तर आभार प्रदर्शन कमलनाम साहित्य मंचचे उपाध्यक्ष तथा कवी निंबा पुना बडगुजर यांनी केले.
प्रकाशन सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी प्रा. हेमंत चौधरी, कमलेश चौधरी, विनायक कुलकर्णी, प्रेमराज महाजन, शाळीग्राम चौधरी, भीमराव महाजन (संपादक, माळी भूषण), प्रग्नेश झाम्बरे, सौ. कांचन कमलेश चौधरी, सौ. कांचन विजय महाजन, निंबा पुना बडगुजर आणि सुरेश देशमुख यांनी परिश्रम घेतले. यावेळी कमलनाम साहित्य मंचच्या संचालक मंडळाचीही आवर्जून उपस्थिती होती.
