कवी प्रा. वा. ना. आंधळे. यांच्या अध्यक्षतेखाली त्र्यंबकेश्वरमध्ये शिव मराठी साहित्य संमेलन संपन्न.
Batmidar Jalgaon News
त्र्यंबकेश्वर (प्रतिनिधी):"माझ्या आईच्या पोटी मी जन्मलो अन जगाचे दर्शन झाले, पण ऐन तारुण्यात माझा कवितेच्या पोटी जन्म झाला अन जग मला ओळखू लागले," अशा अत्यंत भावूक व प्रेरक शब्दांत एरंडोल येथील सुप्रसिद्ध कवी तथा प्रा. वा. ना. आंधळे यांनी कवितेचे आणि आईचे नाते उलगडले. त्र्यंबकेश्वर येथील संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज साहित्य नगरीत पार पडलेल्या चौथ्या अखिल भारतीय शिव मराठी साहित्य संमेलनात कवी संमेलनाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते.
शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन, मुक्ताईनगर (जिल्हा जळगाव) यांच्या वतीने दि. ३ व ४ ऑक्टोबर २०२६ रोजी त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तीनाथ महाराज समाधी मंदिर परिसरातील भव्य सभागृहात हे दोनदिवसीय संमेलन मोठ्या दिमाखात संपन्न झाले. संभाजीनगर येथील उज्जैनकर फाउंडेशनचे राज्याध्यक्ष तथा सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा. डॉ. सुभाष बागल यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा पार पडला.
भव्य ग्रंथ दिंडी आणि संमेलनाचे विशेष आकर्षण.
संमेलनाची सुरुवात एका भव्य आणि दिव्य ग्रंथ दिंडीने झाली, जिने उपस्थितांचे लक्ष वेधले. या दिंडीदरम्यान संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांना आदिशक्ती संत मुक्ताई यांच्याकडून भव्य व दिव्य हार अर्पण करण्यात आला, जे या संपूर्ण सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ठरले.
कवी संमेलनात राज्यभरातून कवींचा सहभाग.
एरंडोलचे कवी प्रा. वा. ना. आंधळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेले कवी संमेलन अत्यंत रंगतदार ठरले. या वेळी व्यासपीठावर फाऊंडेशनचे डॉ. मारुती गुरव, ज्येष्ठ साहित्यिक तुळशीराम बोबडे, वासुदेव खोपडे, प्रा. डॉ. मंदा नांदुरकर, संजय ठोसर, कवी अशोक मोहिते, प्राचार्य डॉ. पंढरीनाथ शेळके, सौ. रूपाली चिंचोलकर, सौ. मेघा पाटील, प्रा. विनायक पाटील, जगन्नाथ बुडूखले गुरुजी, पांडुरंग दैवज्ञ, शंकरराव अनासुने, बाळूभाऊ इटणारे, रामदास कोरडे यांच्यासह गोवा, कर्नाटक आणि गुजरात राज्यांमधून आलेले विविध मान्यवर उपस्थित होते.
तसेच नाशिकचे डॉ. रमाकांत जाधव, डॉ. श्यामकुमार दुसाने, जळगावचे मधुकर पोतदार, भुसावळचे ज्ञानेश्वर घुले, नांद्राचे स्वप्नील पाटील, एरंडोलचे निंबा बडगुजर, धाराशिवचे डॉ. मधुकर हुजरे, शिरपूरचे अरविंद भामरे, धुळ्याचे प्रा. अश्विन अमृतकर, श्रीमती रंजना पवार, बदलापूरचे रमेश उज्जैनकर, बुलढाणा येथील डी.आर. बांगर, कोल्हापूरचे प्रवीण सूर्यवंशी, प्रा. डॉ. सविता व्हटकर, प्रा. आरती लाटणे, साताप्पा सुतार, लातूरचे गुरु हराळे, बेळगावचे शांताराम भादवणकर, सौ. धनश्री म्हेत्रस यांच्यासह शेकडो कवी व कवयित्रींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपल्या कविता सादर केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. प्रीती नंदलाल मोरे आणि सौ. सारिका जोशी यांनी केले.
कवितेचे मातृपद आणि कृतज्ञता सोहळा.
आपल्या अध्यक्षीय भाषणात पुढे बोलताना प्रा. वा. ना. आंधळे म्हणाले की, "कविता जन्माला आली अन जगण्याला मोल आले. दृष्टी आणि सृष्टी सुंदर झाली. कविता भेदाच्या पलीकडे नांदत असल्याने जगाचे मातृपद कवितेकडे जाते." संमेलनाच्या यशस्वितेचे श्रेय त्यांनी उज्जैनकर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा मुख्य आयोजक डॉ. शिवचरण उज्जैनकर, त्यांचे कुटुंबिय आणि पदाधिकाऱ्यांना दिले.
