जळगाव : ज्येष्ठ कवी भगवान भटकर यांच्या ‘कवितेच्या वळणवाटा’ (मराठी) आणि ‘तुकबंदी’ (हिंदी) या दोन काव्यसंग्रहांचे प्रकाशन जळगाव येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. यावेळी सुप्रसिद्ध कवी व समीक्षक प्रा. वा. ना. आंधळे यांनी भटकर यांच्या कवितांमधील दलित आणि ललित जाणिवांचा संगम स्पष्ट करत त्यांच्या साहित्यिक योगदानाचे कौतुक केले.
दि. १ नोव्हेंबर २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील अल्पबचत भवनाच्या सभागृहात हा प्रकाशन सोहळा पार पडला. ‘कवितेच्या वळणवाटा’ या मराठी काव्यसंग्रहाचे प्रकाशन प्रा. वा. ना. आंधळे यांच्या हस्ते, तर ‘तुकबंदी’ या हिंदी काव्यसंग्रहाचे प्रकाशन डॉ. रफिक काझी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना प्रा. आंधळे म्हणाले की, कवी भगवान भटकर यांचा लेखनपिंड मानवतावादी आहे. समाजातील विकृती, सामान्य माणसांच्या आणि उपेक्षितांच्या वाट्याला येणाऱ्या वेदना व व्यथा त्यांच्या सृजनातून प्रभावीपणे व्यक्त होतात. ज्या ताकदीने ते आपल्या कवितेतून विद्रोही भूमिका मांडतात, त्याच ताकदीने लालित्यपूर्ण लेखनही करतात. त्यांची कविता आत्मस्वर लाभलेली कविता असल्याचे त्यांनी नमूद केले.
कवी भटकर यांनी मुक्तछंद, ओवी, गीतकाव्य, गझल, लावणी, चारोळी आणि तिनोळी अशा विविध काव्यप्रकारांतून आपला स्वतंत्र साहित्यिक ठसा उमटवला आहे. त्यांच्या मूल्याधिष्ठित काव्यप्रवासाचे प्रा. आंधळे यांनी विशेष कौतुक केले.
डॉ. रफिक काझी यांनी ‘तुकबंदी’ या हिंदी काव्यसंग्रहातील लेखनसौंदर्यावर प्रकाश टाकला. तसेच कवी भगवान भटकर यांच्या सृजनशीलतेचा परिचय करून देताना संग्रहातील काही गझलांचा संदर्भासह परामर्श घेतला.
कवी भगवान भटकर यांनी आपल्या मनोगतातून आजवरचा काव्यप्रवास उलगडला. यावेळी त्यांनी उपस्थित काव्यरसिक, साहित्यिक मित्रपरिवार आणि कुटुंबीयांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात प्रा. डॉ. देवेंद्र इंगळे यांनी कवी भगवान भटकर यांच्या व्यक्तिमत्त्वातील माणुसकीच्या पैलूंवर प्रकाश टाकला. तसेच आकाशवाणी आणि सह्याद्री दूरदर्शनवरील त्यांच्या लेखन व सादरीकरणाच्या कार्याचा गौरवपूर्ण आढावा घेतला.
या प्रकाशन सोहळ्याला अथर्व प्रकाशन संस्थेचे संचालक तथा प्रमुख अतिथी युवराज माळी, सौ. यशोदाताई भटकर आणि डॉ. सुधीर भटकर यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सुंदर आयोजन आणि उत्कृष्ट नियोजन डॉ. सुधीर भटकर व त्यांच्या मित्रपरिवाराने केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी डॉ. अशोक पारधे यांनी केले, तर आभार प्रदर्शन कवी गौरव हरताळे यांनी मानले.
या सोहळ्याला जळगावातील कवी, साहित्यिक, साहित्यप्रेमी तसेच भटकर परिवारावर प्रेम करणाऱ्या स्नेहीजनांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.
