एरंडोलच्या उत्तम नगरात प्रलोभनाद्वारे धर्मांतराचा कथित प्रयत्न; एकाविरुद्ध गुन्हा दाखल.

 


एरंडोल | प्रतिनिधी एरंडोल शहरातील पद्मालय फाट्याजवळील उत्तम नगर परिसरात आर्थिक प्रलोभने दाखवून धर्मांतरासाठी प्रवृत्त केल्याचा कथित प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी कैलास सहादर बारेला (रा. धरणगाव) याच्याविरुद्ध महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम, २०२६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, उत्तम नगर परिसरातील पावरा समाजाच्या वस्तीत राहणाऱ्या गरीब व गरजू नागरिकांना आर्थिक मदत, पैसे तसेच विविध वस्तू देण्याचे आमिष दाखवून ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी प्रवृत्त केले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या कथित प्रकाराची माहिती विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.


२ नोव्हेंबर २०२६ रोजी पोलिसांसह घटनास्थळी कारवाई...


दिनांक २ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पोलीस पथकासह संबंधित ठिकाणी जाऊन पाहणी केली. त्यानंतर या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली. तक्रारीच्या अनुषंगाने कैलास सहादर बारेला याच्याविरुद्ध महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम, २०२६ अंतर्गत गुन्हा दाखल झाल्याचे सांगण्यात येत आहे.


विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाकडून निवेदन...


या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आज विश्व हिंदू परिषद, बजरंग दल तसेच समस्त हिंदू बांधवांच्या वतीने एरंडोल पोलीस निरीक्षक सुनील पवार यांना निवेदन देण्यात आले.


उत्तम नगर परिसरात घडलेल्या कथित प्रकाराची निष्पक्ष व सखोल चौकशी करण्यात यावी. या प्रकरणात अन्य व्यक्ती किंवा संघटनांचा सहभाग आहे का, तसेच आर्थिक व्यवहारांचे स्रोत काय आहेत, याचीही तपासणी करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.


दोषींवर कठोर कारवाईची मागणी...


समाजातील गरीब, आदिवासी व गरजू नागरिकांच्या आर्थिक परिस्थितीचा गैरफायदा घेऊन पैशांचे किंवा वस्तूंचे आमिष दाखवून धर्मांतरासाठी प्रवृत्त करण्याचे प्रकार घडत असतील, तर त्यांची गांभीर्याने दखल घेतली पाहिजे, अशी भूमिका विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली.


प्रत्येक नागरिकाला संविधानाने धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे. मात्र, फसवणूक, दबाव किंवा प्रलोभनाद्वारे धर्मांतर घडवून आणण्याचा प्रयत्न होत असल्यास त्याची कायदेशीर चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली.


या प्रकरणाचा सखोल तपास करून दोषी आढळणाऱ्या सर्व संबंधितांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अन्यथा भविष्यात आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.


टीप : सदर बातमी सुत्रांच्या प्राप्त माहितीनुसार प्रसिद्ध केली असून, अधिकृत पडताळणीनंतर आवश्यकतेनुसार बदल केले जातील.