आडगाव (ता. एरंडोल) : संतविचारांचा जागर, वारकरी परंपरेचा भक्तिमय आविष्कार आणि समाजासाठी झटणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांचा गौरव अशा त्रिवेणी संगमाने आडगावची भूमी अक्षरशः दुमदुमून गेली. ‘वैचारिक स्वराज्य’च्या वतीने आयोजित ‘खान्देश कर्तृत्व पर्व २०२६’ हा सोहळा मोठ्या दिमाखात आणि उत्साहात संपन्न झाला. जणू पंढरपूरची वारीच आडगावच्या नगरीत अवतरल्याचा भास उपस्थितांना झाला. खान्देशातील धुरिणांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्यात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अकरा मान्यवरांचा सन्मान करण्यात आला, तसेच ‘वेध’ वार्षिकांकाचे प्रकाशनही मोठ्या दणक्यात झाले.
मान्यवरांच्या उपस्थितीत दिमाखदार शुभारंभ
भारत सरकारचे माजी केंद्रीय संरक्षण मंत्री डॉ. सुभाष बाबा भामरे यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा पार पडला. महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. संत एकनाथ महाराजांचे चौदावे वंशज ह.भ.प. डॉ. पुष्कर महाराज गोसावी यांच्या आध्यात्मिक उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढवली. तसेच याप्रसंगी गुलाबरावजी वाघ, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत पाटील आणि ॲड. विश्वासराव भोसले उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी संत माऊलींच्या प्रतिमेचे पूजन, पुष्पहार अर्पण आणि दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर संस्थेचे संस्थापक ह.भ.प. दिनेश महाराज पाटील फरकांडेकर यांनी आपल्या प्रास्ताविकातून ‘वैचारिक स्वराज्या’च्या स्थापनेमागील भूमिका विशद केली. समाजातील खऱ्याखुऱ्या गुणवत्तेला आणि निस्वार्थी कार्याला हक्काचे व्यासपीठ मिळवून देणे हाच या महोत्सवाचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
पुरस्कार संस्कृतीवर डॉ. पुष्कर महाराज गोसावी यांचे परखड विचार
संत एकनाथ महाराजांचे चौदावे वंशज ह.भ.प. डॉ. पुष्कर महाराज गोसावी यांनी आपल्या मनोगतात आजच्या पुरस्कार संस्कृतीवर परखड भाष्य केले. “आज अनेक ठिकाणी पुरस्कारांचा बाजार मांडला जातो; मात्र दिनेश महाराजांनी कसलाही भेद न करता समाजातील खऱ्या अर्थाने कार्य करणारे हिरे शोधून त्यांचा सन्मान केला आहे,” असे गौरवोद्गार त्यांनी काढले. माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनीही वैचारिक स्वराज्याच्या कार्याचे कौतुक करत, अशा वैचारिक चळवळी प्रत्येक गावात निर्माण झाल्या पाहिजेत, असे आवाहन केले.
विविध क्षेत्रातील अकरा कर्तृत्ववानांचा गौरव
या सोहळ्यात वैचारिक स्वराज्याच्या वतीने ह.भ.प. डॉ. पुष्कर महाराज गोसावी यांना विशेष ‘जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. याशिवाय खान्देशातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या १० मान्यवरांना खालीलप्रमाणे सन्मानित करण्यात आले:
- ह.भ.प. भानुदास महाराज आडगावकर – जीवनगौरव पुरस्कार
- श्री. दिलीप खोडपे सर – लोकशिक्षक पुरस्कार
- श्रीमती लीलाताई चौधरी – खान्देशाची रणरागिणी पुरस्कार
- श्री. भागवत पाटील – समाजभूषण पुरस्कार
- श्री. भैय्यासाहेब पाटील – समाजभूषण पुरस्कार
- प्रा. श्री. सुनील पाटील – जीवनगौरव पुरस्कार
- श्री. विनायक पाटील – खान्देशचा बळीराजा पुरस्कार
- जिल्हा परिषद शाळा, होळ – ज्ञानदीप लावू जगी पुरस्कार
- श्री. संजय हिरे – शब्दसाधना पुरस्कार
- श्री. अमृत देशमुख – लोकसेवक पुरस्कार
अध्यक्षीय मनोगतात बोलताना माजी केंद्रीय मंत्री डॉ. सुभाष बाबा भामरे यांनी, खान्देशातील खऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींना शोधून त्यांचा सन्मान करणारा हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आणि प्रेरणादायी असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र ठाकरे यांनी केले, तर आभार ॲड. विश्वासराव भोसले यांनी मानले. शेवटी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पसायदानाने या ऐतिहासिक सोहळ्याची मंगलमय सांगता झाली.
