जिल्हा न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी बेमुदत संप; एरंडोल न्यायालयाचे कामकाजही बंद.

प्रतिनिधी | बातमीदार महाराष्ट्र न्यूज वृत्तसेवा.
एरंडोल न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा समान वेतनाच्या मागणीसाठी राज्यव्यापी बेमुदत संप

 एरंडोल : समान कामासाठी समान वेतनासह विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्रातील जिल्हा न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी सोमवार, १७ नोव्हेंबर २०२६ पासून राज्यव्यापी बेमुदत संप पुकारला आहे. या संपात एरंडोल येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयातील कर्मचाऱ्यांनीही सहभागी होत कामकाज बंद ठेवले.

मा. उच्च न्यायालयातील कर्मचाऱ्यांप्रमाणेच महाराष्ट्रातील सर्व जिल्हा न्यायालयीन कर्मचाऱ्यांना वेतन मिळावे, या मागणीसंदर्भात सुमारे २० महिन्यांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठविला होता. मात्र, अद्याप या प्रस्तावावर शासनाकडून कोणतीही कार्यवाही झालेली नसल्याचा कर्मचाऱ्यांचा आरोप आहे.

या प्रलंबित मागणीसह समान काम, समान वेतन आणि इतर विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य न्यायालयीन गट-क कर्मचारी महासंघ, महाराष्ट्र राज्य न्यायालयीन लघुलेखक संघटना, महाराष्ट्र राज्य न्यायालयीन बेलीफ कर्मचारी संघटना तसेच महाराष्ट्र राज्य न्यायालयीन गट-ड कर्मचारी संघटना यांच्या माध्यमातून हा संप पुकारण्यात आला आहे.

राज्यातील विविध जिल्हा न्यायालयांतील कर्मचाऱ्यांनी या आंदोलनात सहभाग नोंदविला असून, एरंडोल न्यायालयातील कर्मचाऱ्यांनीही कामकाजापासून दूर राहत राज्यव्यापी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.