दिवाळीत साकारली 'मल्हार गड' किल्ल्याची आकर्षक प्रतिकृती!
बातमीदार महाराष्ट्र न्यूज वृत्तसेवा
एरंडोल:आजच्या डिजिटल आणि मोबाईलच्या युगात नव्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली इतिहासाची महती समजावी, यासाठी एरंडोल तालुक्यातील हनुमंतखेडे सिम येथील गर्जना ग्रुप बाल मित्र मंडळाच्या ‘मल्हार गटातील’ चिमुरड्यांनी एक कौतुकास्पद उपक्रम राबवला आहे. यंदाच्या दिवाळीनिमित्त या बाल मित्रांनी माती, दगड, कागद आणि घरातील टाकाऊ वस्तूंचा अचूक वापर करून Malhar Gad Fort replica Hanumantkhede Sim Erandol साकारला आहे. या अनोख्या आणि आकर्षक कलाकृतीने संपूर्ण गावसह परिसराचे लक्ष वेधून घेतले आहे.
शिवकालीन इतिहासाची जिवंत प्रचिती...
या साकारलेल्या ऐतिहासिक वास्तूवर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, दिमाखात फडकाणारा भगवा ध्वज, शौर्य सांगणारे मावळे, तोफा, बुरुज, महादरवाजा आणि मजबूत तटबंदीची अत्यंत सूक्ष्म व सुंदर मांडणी करण्यात आली आहे. रात्रीच्या वेळी केलेली रोषणाई आणि दिव्यांच्या प्रकाशात न्हाऊन निघालेला हा किल्ला पाहण्यासाठी ग्रामस्थ व लहान मुलांनी मोठी गर्दी केली होती. या उपक्रमादरम्यान उपस्थित कार्यकर्त्यांनी व ग्रामस्थांनी एकत्र येऊन छत्रपती शिवाजी महाराजांची आरती केली.
शिस्त, स्वच्छता आणि एकजुटीचा संदेश..
या बाल मित्रांनी केवळ किल्ले बनवण्यापुरते मर्यादित न राहता, कामातील शिस्त, परिसर स्वच्छता आणि उत्तम एकजुटीचे अनोखे दर्शन घडवले. मोबाईलच्या आभासी जगापासून दूर राहून मुलांनी आपल्या मातीशी आणि ऐतिहासिक वारशाशी जुळलेली नाळ अधिक घट्ट केल्याबद्दल पालकांनी आणि गावकऱ्यांनी त्यांचे भरभरून कौतुक केले.
मेहनती बाल शिलेदार..
हा सुंदर किल्ला साकारण्यासाठी आयुष पाटील, चेतन पाटील, वेदांत पाटील, प्रथमेश पाटील, हर्षल पाटील, पवन पाटील, यश पाटील, कल्याण पाटील, मनीष पाटील, शिव पाटील, कार्तिक पाटील, येदुराज पाटील आणि वियांश पाटील आदी बाल मित्रांनी प्रचंड मेहनत घेतली. यासर्जनशील उपक्रमामुळे मुलांमध्ये शिवप्रेम आणि इतिहासाबद्दलची आवड मोठ्या प्रमाणावर वाढीस लागली आहे.
आगामी काळातील मानस..
मंडळाच्या या सुंदर उपक्रमाचे संपूर्ण एरंडोल तालुक्यातून कौतुक होत आहे. येत्या दिवाळीत रायगड, प्रतापगड, सिंहगड आणि शिवनेरी यांसारख्या प्रसिद्ध ऐतिहासिक किल्ल्यांच्या हुबेहूब प्रतिकृती साकारण्याचा मानस बाल मित्रांनी व्यक्त केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास घराघरांपर्यंत पोहोचावा आणि प्रत्येक भारतीयाची मान अभिमानाने उंचावावी, हाच यामागील मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

