दत्तक मुलांना दिलेली शेतजमीन ज्येष्ठांना परत; एरंडोल प्रांताधिकाऱ्यांचा ऐतिहासिक निकाल.

सांभाळ न केल्यास बक्षीसपत्राची जमीन परत; एरंडोल न्यायाधिकरणाचा निकाल.

एरंडोल जि. जळगाव : वृद्धापकाळात सांभाळ आणि औषधोपचार करतील या विश्वासाने दत्तक घेतलेल्या मुलांना बक्षीसपत्राने दिलेली शेतजमीन, पालकांची हेळसांड झाल्यास पुन्हा ज्येष्ठ नागरिकांना परत मिळू शकते. असा महत्त्वपूर्ण निकाल ज्येष्ठ नागरिक निर्वाह न्यायाधिकरणाचे अध्यक्ष तथा उपविभागीय दंडाधिकारी मनीषकुमार गायकवाड यांनी १८ नोव्हेंबर २०२६ रोजी दिला. यासोबतच संबंधित दत्तक मुलगा व सुनेला वृद्ध दांपत्याला दरमहा ३ हजार रुपये निर्वाह भत्ता देण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.

Erandol sub divisional magistrate court senior citizen property gift deed verdict Jalgaon news

काय आहे संपूर्ण प्रकरण?

पारोळा तालुक्यातील जोगलखेडे येथील ज्येष्ठ नागरिक वसंत सीताराम पाटील (वय ६५) आणि रमणबाई वसंत पाटील (वय ६०) यांना अपत्य नसल्याने त्यांनी ईश्वर आणि योगेश या दोन मुलांना दत्तक घेतले होते. म्हातारपणी आधार मिळेल या अपेक्षेने त्यांनी आपल्या मालकीची शेतजमीन दोन्ही मुलांच्या नावे समान वाटणी करून नोंदणीकृत बक्षीसपत्राद्वारे दिली होती.

तीन वर्षांपूर्वी लहान मुलगा योगेश याचे निधन झाले. त्यानंतर दुसरा मुलगा ईश्वर पाटील आणि सून वैष्णवी योगेश पाटील यांनी वृद्ध आई-वडिलांचा सांभाळ व उपचाराची जबाबदारी झिडकारल्याचा आरोप आहे. यामुळे पाटील दांपत्यावर मोडकळीस आलेल्या घरात राहण्याची आणि उपासमारीची वेळ आली.

न्यायाधिकरणाचा निकाल आणि निर्वाह भत्त्याचे आदेश.

या प्रकाराविरोधात वसंत व रमणबाई पाटील यांनी १५ सप्टेंबर २०२६ रोजी 'माता-पिता व ज्येष्ठ नागरिक यांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७' अंतर्गत एरंडोल उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे अर्ज दाखल केला होता. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद व कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर उपविभागीय दंडाधिकारी मनीषकुमार गायकवाड यांनी कायद्याच्या कलम २३ अन्वये निर्णय दिला.

सांभाळ करण्याच्या अटीवर दिलेली मालमत्ता पालकांची देखभाल न केल्यास रद्द ठरते, असे स्पष्ट करत न्यायाधिकरणाने दत्तक मुलांना करून दिलेली बक्षीसपत्रे अवैध घोषित केली. परिणामी, शेतजमिनीची मालकी पुन्हा वृद्ध दांपत्याकडे परत आली आहे. तसेच, सप्टेंबर २०२६ पासून प्रत्येक महिन्याच्या ५ तारखेपूर्वी ईश्वर वसंत पाटील आणि वैष्णवी योगेश पाटील यांनी प्रत्येकी १५०० रुपये याप्रमाणे एकूण ३००० रुपये निर्वाह भत्ता द्यावा, असे आदेशात नमूद केले आहे.

वृद्धापकाळात सांभाळ करण्याच्या अपेक्षेने मुलांना किंवा नातेवाईकांना मालमत्ता हस्तांतरित केल्यानंतर जर ज्येष्ठ नागरिकांची हेळसांड होत असेल, तर कायद्याच्या कलम २३ अन्वये न्यायाधिकरणाकडे अर्ज करून दिलेली मालमत्ता परत मिळवण्याचा अधिकार ज्येष्ठ नागरिकांना आहे.

मनीषकुमार गायकवाड, उपविभागीय दंडाधिकारी, एरंडोल

या निर्णयामुळे जोगलखेडेसह पारोळा, एरंडोल आणि जळगाव जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांना मोठा कायदेशीर दिलासा मिळाला असून प्रशासनाच्या या भूमिकेचे सर्वत्र स्वागत होत आहे.