हॉटेल कामगार ते प्राध्यापक: एरंडोलचे डॉ. आत्माराम चिमकर यांचे निधन; संघर्षाचा प्रवास संपला.

एरंडोल जि. जळगाव : गरिबी, प्रतिकूल परिस्थिती आणि वैयक्तिक संकटांची साखळी भेदून प्राध्यापकपदापर्यंत मजल मारणारे एरंडोल येथील डी. डी. एस. पी. कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे ज्येष्ठ प्राध्यापक डॉ. आत्माराम तुकाराम चिमकर यांचे २० नोव्हेंबर रोजी दुःखद निधन झाले. निवृत्तीला अवघे आठ महिने शिल्लक असताना आणि तब्बल ३१ वर्षांच्या अध्यापन सेवेनंतर त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

: प्रा. डॉ. आत्माराम तुकाराम चिमकर यांचे छायाचित्र, एरंडोल
एरंडोल येथील ज्येष्ठ प्राध्यापक डॉ. आत्माराम चिमकर.


मजुरीच्या कुटुंबातून शिक्षणाची जिद्द.

मुक्ताईनगर तालुक्यातील वढोदा या छोट्या गावात एका हातमजुरी करणाऱ्या कुटुंबात डॉ. चिमकर यांचा जन्म झाला. आई-वडील निरक्षर आणि आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असतानाही शिक्षणाच्या जोरावरच आयुष्य बदलता येईल, हा विश्वास त्यांनी बालपणापासून जपला. प्राथमिक शिक्षण वढोदा येथे पूर्ण केल्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली बोदवड येथील हायस्कूलच्या बोर्डिंगचा आधार घेतला, ज्यामुळे राहण्या-खाण्याचा प्रश्न सुटला.

हॉटेलमधील काम ते महाविद्यालयीन अध्यापन.

भुसावळ येथील नाहटा महाविद्यालयात पदवी व पदव्युत्तर (एम.ए.) शिक्षण घेत असताना कुटुंबाला हातभार लावण्यासाठी त्यांनी हॉटेलमध्ये वेटर आणि कुक म्हणूनही काम केले. कोणतीही पार्श्वभूमी किंवा आर्थिक पाठबळ नसताना एरंडोल येथील डी. डी. एस. पी. महाविद्यालयाचे तत्कालीन अध्यक्ष स्व. दिगंबरदादा पाटील यांनी त्यांची जिद्द ओळखून त्यांना तासिका तत्त्वावर संधी दिली. पुढे दादासाहेब दि. शं. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ते पूर्णवेळ प्राध्यापक झाले आणि १९९५ पासून त्यांनी आपल्या अध्यापनाने विद्यार्थ्यांवर ठसा उमटवला.

संकटांवर मात करत पीएच.डी. पूर्ण.

कौटुंबिक आणि आरोग्याच्या आघातांवरही डॉ. चिमकर यांनी धैर्याने मात केली. काही महिन्यांपूर्वीच त्यांची मुलगी प्रतीक्षा हिचे निधन झाले होते; तत्पूर्वी पुणे-मुंबई येथे दीर्घकाळ आजारावर उपचार सुरू असतानाही त्यांनी संशोधनाची कास सोडली नाही. आजाराशी झुंज देतच त्यांनी पीएच.डी. पदवी संपादन केली. त्यांच्या पश्चात पत्नी ललिता आणि मुलगा प्रतीक असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने एरंडोलसह जळगाव जिल्ह्याच्या शैक्षणिक व सामाजिक वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे.