एरंडोल ता. एरंडोल, जि. जळगाव :- दिवाळीच्या गर्दीच्या हंगामात प्रवाशांना सुरक्षित आणि सुरळीत सेवा देत एरंडोल एसटी आगाराने दिवाळी वाहतूक मोहिमेत उत्पन्नाचा नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे. दि. ०१ नोव्हेंबर २०२६ ते १५ नोव्हेंबर २०२६ या पंधरा दिवसांच्या कालावधीत आगाराने तब्बल १ कोटी २२ लाख रुपयांचे उत्पन्न मिळवून गेल्या वर्षीच्या तुलनेत ३१ लाख रुपयांची घसघशीत वाढ नोंदवली आहे.
या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत जळगाव विभागाचे विभाग नियंत्रक प्रज्ञेश सतीश बोरसे यांनी आगार व्यवस्थापक आणि सर्व कर्मचाऱ्यांचे अधिकृत अभिनंदन पत्राद्वारे कौतुक केले आहे.
![]() |
टीम बातमीदार महाराष्ट्र न्यूज तर्फे हार्दिक अभिनंदन.. |
दिवाळी सणादरम्यान प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन एरंडोल आगारातील बसेसनी एकूण २ लाख ६१ हजार किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला. या कालावधीत सुमारे १ लाख १३ हजार प्रवाशांनी एसटीच्या सुरक्षित प्रवासाचा लाभ घेतला, ज्यामुळे सर्वसामान्य जनमानसात राज्य परिवहन महामंडळाची (MSRTC) प्रतिमा अधिक उंचावली आहे.
या यशामागे आगार व्यवस्थापक, पालक अधिकारी आणि सर्व विभागांतील कर्मचाऱ्यांचे अचूक नियोजन आणि सांघिक प्रयत्न कारणीभूत ठरले आहेत. चालक आणि वाहकांनी प्रवाशांच्या सोयीसाठी जादा फेऱ्यांची कामगिरी चोख बजावली, तर यांत्रिक कर्मचाऱ्यांनी तांत्रिक देखभाल व दुरुस्तीची कामे वेळेत पूर्ण करून सर्व बसेस मार्गावर उपलब्ध ठेवल्या. वाहतूक आणि यांत्रिकी विभागातील उत्तम समन्वयामुळे प्रवाशांना वेळेवर सेवा देणे शक्य झाले.
प्रशासकीय कर्मचारी, शाखा प्रमुख, यांत्रिक व वाहतूक विभागातील सर्व सहकाऱ्यांनी घेतलेल्या अथक परिश्रमामुळेच हे लक्षणीय उद्दिष्ट साध्य झाले असल्याचे नमूद करत, विभाग नियंत्रक प्रज्ञेश सतीश बोरसे यांनी संपूर्ण एरंडोल आगार टीमचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

