प्रतिनिधी बातमीदार महाराष्ट्र न्यूज वृत्तसेवा
एरंडोल (ता. एरंडोल, जि. जळगाव): येथील कर्मवीर अभ्यासिका हॉलमध्ये 'जनजातीय गौरव सेवा सप्ताह २०२६' निमित्त एरंडोल नगरपालिका जनजातीय गौरव सेवा सप्ताह उपक्रमांतर्गत शहरातील आदिवासी महिला बचत गटांच्या सदस्यांसाठी विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. १८ नोव्हेंबर २०२६ रोजी झालेल्या या शिबिरास महिलांचा लक्षणीय सहभाग लाभला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान एरंडोल नगरपरिषदेचे नगराध्यक्ष डॉ. नरेंद्र धुडकू ठाकूर यांनी भूषवले. याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा उद्योग केंद्र, जळगावचे विजय सैदाणे तसेच नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मा. श्री. तुषार नेरकर मंचावर उपस्थित होते. तसेच नगरसेविका सौ. मनकरणाबाई चौधरी आणि नगरसेविका कागजी नजमाबी सईद यांची विशेष उपस्थिती होती.
उपस्थित मान्यवरांनी आदिवासी महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी बचत गटांच्या माध्यमातून उभारता येणाऱ्या स्वयंरोजगाराच्या विविध वाटा उलगडून दाखवल्या. लहान प्रमाणातील व्यवसाय किंवा लघुउद्योग कसे सुरू करता येतील, त्यासाठी शासनाच्या कोणत्या योजनांचा लाभ घेता येतो आणि प्रशासनाकडून व उद्योग विभागाकडून कोणते सहकार्य उपलब्ध आहे, याविषयी सखोल मार्गदर्शन करण्यात आले. प्रत्येक महिलेने आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर होण्यासाठी पुढाकार घेत नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू करावेत, असे आवाहन वक्ते व मान्यवरांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती कुसुम पाटील यांनी केले, तर प्रास्ताविक कार्यालय अधीक्षक शिवशंकर ठाकूर यांनी सादर केले. एरंडोल शहरातील आदिवासी महिला बचत गटांच्या सदस्यांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत मार्गदर्शन सत्राचा लाभ घेतला.
