खडवलीतील वृद्धाश्रमात मायेचा ओलावा; विलेपार्ले गुरूस्थान लोकसेवा मंडळाकडून जीवनावश्यक वस्तू व धान्य वाटप

प्रतिनिधी बातमीदार, गुरुदत्त वाकदेकर - महाराष्ट्र न्यूज वृत्तसेवा (Kalyan / Thane News)

कल्याण (Kalyan News): सामाजिक बांधिलकी आणि मानवसेवेचा वसा जपत विलेपार्ले गुरूस्थान लोकसेवा मंडळाच्या सदस्यांनी कल्याण तालुक्यातील खडवली (Khadavali Old Age Home) परिसरातील एका वृद्धाश्रमाला सदिच्छा भेट दिली. या उपक्रमांतर्गत वृद्धाश्रमातील आजी-आजोबांना दैनंदिन जीवनावश्यक वस्तू आणि धान्याचे वाटप करून त्यांना मायेचा आधार देण्यात आला.

त):  Photo Alt Text: कल्याणमधील खडवली वृद्धाश्रमातील आजी-आजोबांना विलेपार्ले गुरूस्थान लोकसेवा मंडळाच्या वतीने जीवनावश्यक वस्तू व धान्य वाटप करताना सदस्य

या भेटीदरम्यान मंडळाच्या सदस्यांनी केवळ वस्तूंचे वाटप न करता, तेथील ज्येष्ठ नागरिकांची अत्यंत आस्थेने विचारपूस केली. त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधत आणि त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होत सदस्यांनी काही अविस्मरणीय व आनंदाचे क्षण त्यांच्यासोबत घालवले.

आजी-आजोबांच्या दैनंदिन आरोग्याची आणि गरजांची काळजी घेत त्यांना खोबरेल तेल, कंगवे, टूथपेस्ट, टूथब्रश, आंघोळीचे साबण आणि प्रौढांसाठीचे डायपर्स (Adult Diapers) यांसारख्या आवश्यक वस्तू सुपूर्द करण्यात आल्या. यासोबतच वृद्धाश्रमासाठी गहू, तांदूळ आणि विविध कडधान्यांचा साठाही वितरित करण्यात आला. आपल्याला कोणीतरी आपुलकीने भेटायला आले आहे, या भावनेने आजी-आजोबांच्या चेहऱ्यावर उमटलेले समाधानाचे हास्य आणि त्यांनी दिलेले मनापासूनचे आशीर्वाद हीच आमच्यासाठी सर्वात मोठी पावती असल्याची भावना मंडळाच्या सदस्यांनी व्यक्त केली.

"दुजियाचे हित चिंतावे, होईल तितके भले करावे, यथानुशक्ती धर्म आचरावे, तरीच मिळावे साईपाय!" या संतवचनातील संदेश प्रत्यक्ष कृतीत उतरवत मंडळाने खऱ्या अर्थाने सेवाभाव जपला. माणुसकी जपण्यातच खरे समाधान आणि निस्वार्थ सेवेतच खरा आनंद दडलेला असतो, असा प्रत्यय या उपक्रमातून आला.