प्रतिनिधी बातमीदार, महाराष्ट्र न्यूज वृत्तसेवा (Jalgaon News / Khandesh)
एरंडोल (Erandol News): कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (Gokul Milk Union) निवडणुकीत मतदारांनी दिलेला स्पष्ट लोकशाही कौल डावलून, शासन नियुक्त सदस्यांच्या माध्यमातून सत्तेचे समीकरण बदलण्याचा बेकायदेशीर प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. गोकुळ दूध संघ बळकावण्याचा हा डाव तातडीने रोखण्यात यावा, या मागणीसाठी एरंडोल तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसीलदार गोपाळ पाटील यांना निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात नमूद केल्यानुसार, नुकत्याच पार पडलेल्या गोकुळ दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीत काँग्रेसचे आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या नेतृत्वाखालील 'राजर्षी शाहू महाराज शेतकरी समविचारी आघाडी'ने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. एकूण २५ संचालक पदांपैकी समविचारी आघाडीचे १३ उमेदवार विजयी झाले असून, सत्ताधारी महायुतीच्या पॅनलला १२ जागांवर समाधान मानावे लागले.
मात्र, जनतेचा हा कौल स्वीकारण्याऐवजी राज्य सरकारने सत्तेचे पारडे आपल्या बाजूने झुकवण्यासाठी शासन नामनिर्देशित सदस्यांच्या नियुक्तीचा लोकशाहीविरोधी मार्ग अवलंबल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. नियमांना बगल देऊन ५ शासन नियुक्त सदस्यांची नेमणूक केली जात असून, त्यातील ४ सदस्यांना थेट मतदानाचा अधिकार देण्याचा निर्णय अत्यंत अन्यायकारक व घटनाबाह्य असल्याचा आरोप या निवेदनाद्वारे करण्यात आला आहे.
सहकार क्षेत्रातील हा लोकशाहीचा घात रोखण्यासाठी एरंडोल काँग्रेसतर्फे केंद्र व राज्य शासनाकडे तीव्र निषेध नोंदवण्यात आला आहे. या निवेदनावर महाराष्ट्र राज्य ओबीसी विभागाचे उपाध्यक्ष विजय पंढरीनाथ महाजन, तालुकाध्यक्ष सुनील पाटील, शहराध्यक्ष संजय भदाणे, सागर पाटील, रईस शेख, चेतन पाटील, डॉ. प्रफुल्ल रायसिंग, अॅड. हिम्मतराव पाटील, मिलिंद पवार आणि मुरलीधर मराठे यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
* Photo Alt Text:
