प्रा. डॉ. म. सु. पगारे यांच्या पाच ग्रंथांचे कर्मचाऱ्यांच्या हस्ते प्रकाशन.

 
प्रा. डॉ. म. सु. पगारे यांच्या पाच ग्रंथांचे कर्मचाऱ्यांच्या हस्ते प्रकाशन सोहळा

विद्यापीठाचा अनोखा साहित्यिक उपक्रम!.

जळगाव : मराठी साहित्यविश्वात नाविन्यपूर्ण उपक्रमांची परंपरा जपत मानवतावादी विचारवंत आणि ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. म. सु. पगारे यांच्या पाच ग्रंथांचा अनोखा प्रकाशन सोहळा जळगाव येथे उत्साहात पार पडला. विद्यापीठातील भाषा अभ्यास प्रशाळा तसेच विचारधारा प्रशाळेतील कर्मचाऱ्यांच्या हस्ते या ग्रंथांचे प्रकाशन करण्यात आले. सर्वसामान्य कर्मचाऱ्यांना साहित्यिक सन्मानाच्या प्रक्रियेत सहभागी करून घेणारा हा उपक्रम विशेष चर्चेचा ठरला.


प्रा. डॉ. म. सु. पगारे यांनी आपल्या साहित्यलेखनातून माती, गावखेड्यातील माणसे, बोलीभाषा, लोकसंस्कृती आणि मानवतावादी विचारविश्व यांचे विविध पैलू मांडले आहेत. त्यांच्या या साहित्यिक योगदानाची ओळख करून देणाऱ्या ग्रंथांचा प्रकाशन सोहळा वेगळ्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आला होता.


या ग्रंथप्रकाशन सोहळ्यात ‘२४ बोली भाषा’, ‘गावखेड्यातील साहित्य प्रवाहाचा अनुबंध’, ‘मातीची माणसे’, ‘लोकधारा’, ‘परिघाबाहेरच्या साहित्य प्रवाहाचा धम्मप्रवेश’ आणि ‘गावगाडा’ या पुस्तकांचा समावेश होता. ‘२४ बोली भाषा’ आणि ‘गावखेड्यातील साहित्य प्रवाहाचा अनुबंध’ या ग्रंथांचे प्रकाशन गौरव हरताळे यांच्या हस्ते करण्यात आले. ‘मातीची माणसे’ आणि ‘लोकधारा’ या पुस्तकांचे प्रकाशन रेखा साळी यांच्या हस्ते झाले. ‘परिघाबाहेरच्या साहित्य प्रवाहाचा धम्मप्रवेश’ या ग्रंथाचे प्रकाशन चंद्रकांत बिऱ्हाडे यांच्या हस्ते, तर ‘गावगाडा’ या पुस्तकाचे प्रकाशन योगेश चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले.


या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून प्राईम पब्लिकेशनचे प्रकाशक प्रदीप पाटील आणि हिंदी विभागप्रमुख प्रा. डॉ. सुनील कुलकर्णी उपस्थित होते.


पुस्तक निर्मितीच्या प्रवासात सहभागी होण्याचा आनंद : गौरव हरताळे


ग्रंथप्रकाशन सोहळ्यात कर्मचाऱ्यांच्या वतीने गौरव हरताळे यांनी प्रातिनिधिक मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की, या पुस्तकांच्या निर्मितीच्या प्रवासात छोटीशी भूमिका निभावण्याची संधी मिळाली, हे आपले भाग्य आहे. या निमित्ताने लेखकाच्या विचारविश्वात डोकावण्याची, त्यांच्या भावना समजून घेण्याची आणि त्यांच्या शब्दांशी भावनिक नाते जोडण्याची संधी मिळाली.


पुस्तक म्हणजे केवळ शब्दांचा समूह नसून त्यामागे अनुभव, भावना, संघर्ष, चिंतन आणि जीवनदृष्टी असते. लेखकाच्या अनेक दिवसांच्या मेहनतीचा, विचारांचा आणि साहित्यनिर्मितीच्या जिद्दीचा गौरव म्हणजे आजचा हा प्रकाशन सोहळा आहे. प्रा. डॉ. म. सु. पगारे यांच्या लेखणीला नवी ऊर्जा मिळो आणि त्यांच्या साहित्यकृतींना वाचकांचा भरभरून प्रतिसाद लाभो, अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या.


वेगळ्या साहित्यिक उपक्रमातून मिळतो आनंद : प्रा. डॉ. म. सु. पगारे


लेखक प्रा. डॉ. म. सु. पगारे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, साहित्याच्या माध्यमातून काहीतरी वेगळे आणि हटके करण्याची भूमिका आपण नेहमीच जपत आलो आहोत. अशा नाविन्यपूर्ण साहित्यिक उपक्रमांतून समाधान आणि आनंद मिळतो. आपल्या पुस्तकांचे प्रकाशन कर्मचाऱ्यांच्या हस्ते व्हावे, त्यांनाही या आनंदात सहभागी होता यावे आणि हा अनुभव सर्वांसाठी प्रेरणादायी ठरावा, अशी आपली इच्छा होती.


कर्मचाऱ्यांच्या हस्ते ग्रंथप्रकाशन ही प्रेरणादायी संकल्पना : प्रा. डॉ. सुनील कुलकर्णी


कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्रा. डॉ. सुनील कुलकर्णी यांनी प्रा. डॉ. म. सु. पगारे यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले. त्यांनी साहित्यविश्वासमोर एक वेगळा आणि प्रेरणादायी आदर्श ठेवला आहे. सर्वसामान्य कर्मचाऱ्यांच्या हस्ते पुस्तकांचे प्रकाशन करण्याची संकल्पना रमणीय आणि आदर्शवत असून, कर्मचाऱ्यांना दिलेला हा सन्मान गौरवास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.


या साहित्यिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. दीपक खरात यांनी केले. त्यांनी उपस्थितांचे आभारही मानले.


भाषा अभ्यास प्रशाळा व संशोधन केंद्राच्या संचालकांच्या वतीने या कार्यक्रमाची माहिती देण्यात आली.