शिक्षणातून राष्ट्रनिर्मितीचा संदेश (Pandit Nehru Jayanti Jalgaon News)
जळगाव (Jalgaon news): शहरातील डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ कॉम्प्युटर अॅप्लिकेशन (Dr. Varsha Patil Women's College of Computer Application) येथे भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या विशेष सोहळ्याला विद्यार्थिनी, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. निलीमा वारके यांच्या हस्ते पंडित नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन आणि पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर उपस्थितांनी प्रतिमेला अभिवादन करत आदरांजली वाहिली.
या प्रसंगी विचार मांडताना प्रा. आरती वर्मा यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांचे आधुनिक भारताच्या उभारणीतील योगदान आणि राष्ट्रनिर्मितीतील भूमिका अधोरेखित केली. नेहरू यांचे बालकांवरील विशेष प्रेम, शिक्षणाबाबतची दूरदृष्टी आणि प्रगत समाजाची संकल्पना त्यांनी स्पष्ट केली. केवळ शिक्षणाच्या माध्यमातूनच समृद्ध राष्ट्रनिर्मिती आणि समाजाचा सर्वांगीण विकास शक्य आहे, हा नेहरूंचा दृष्टिकोन आजही तितकाच प्रासंगिक असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच बालदिनाचे औचित्य साधत विद्यार्थिनींनी नेहरूंच्या विचारांतून प्रेरणा घेऊन पुढे जावे, असे आवाहनही त्यांनी केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. शिवानी महाजन यांनी पुढाकार घेतला. कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
