एरंडोल :- खान्देशात उष्णतेचा कहर वाढत असताना एरंडोल तालुक्यात उष्माघाताचा संशयित पहिला बळी गेल्याची हृदयद्रावक घटना घडली. सखुबाई अशोक देशमुख (वय ६०, रा. देशमुख मढी, एरंडोल) यांचा शेतात काम करताना मृत्यू झाला.
शुक्रवार (दि.२४) रोजी सखुबाई देशमुख या महेंद्र महाजन यांच्या शेतात निंदणीसाठी गेल्या होत्या. दुपारी १.३० वाजता उन्हाची तीव्रता वाढलेली असताना त्यांना चक्कर येऊन अस्वस्थता जाणवली.सहकाऱ्यांनी त्यांना सावलीत बसवून तातडीने डॉ. सुयश पाटील यांच्या खासगी रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती मृत घोषित केले.सखुबाई यांच्या पश्चात पती व दोन मुले आहेत. शेतमजुरीवर चालणाऱ्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शनिवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.
एरंडोल ग्रामीण रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. कैलास पाटील यांनी सांगितले की, मृत्यूबाबत अधिकृत अहवाल प्राप्त झालेला नाही.दरम्यान, तापमान ४३°C पार गेल्याने प्रशासनाने दुपारी १२ ते ४ बाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.
