जळगाव: 21 वर्षीय तरुणाचा जीव वाचला, सात दिवस व्हेंटिलेटरवर उपचार यशस्वी.

जळगाव : गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल झालेल्या 21 वर्षीय तरुणाचा जीव वाचवण्यात डॉक्टरांना यश आले आहे. वेळेवर उपचार आणि कुटुंबाच्या जागरूकतेमुळे हा तरुण मृत्यूच्या उंबरठ्यावरून परत आला.सावदा परिसरातील भूषण पाटील (वय 21) याच्या वागण्यात गेल्या काही काळात बदल दिसून येत होता. वाढता मानसिक ताण, एकटेपणा आणि व्यसनाधीनतेमुळे त्याची मानसिक स्थिती बिघडत गेली. या पार्श्वभूमीवर त्याने अत्यंत धोकादायक निर्णय घेतला.

जळगाव: 21 वर्षीय तरुणाचा जीव वाचला, सात दिवस व्हेंटिलेटरवर उपचार यशस्वी


घटनेची माहिती मिळताच त्याच्या बहिणीने तात्काळ कृती करत त्याला डॉ. उल्हास पाटील रुग्णालय येथे दाखल केले. रुग्णाची प्रकृती अतिशय गंभीर असल्याने त्याला लगेचच अतिदक्षता विभागात हलवण्यात आले.तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने वेळ न घालवता उपचार सुरू केले. सलग सात दिवस रुग्ण व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आला. या काळात डॉक्टर, नर्सिंग स्टाफ आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांनी सतत लक्ष ठेवत उपचार केले.


हळूहळू रुग्णाने उपचारांना प्रतिसाद देण्यास सुरुवात केली. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्याला व्हेंटिलेटरवरून काढण्यात आले. सध्या त्याची प्रकृती स्थिर असून तो धोक्याबाहेर आहे.या घटनेत कुटुंबाच्या वेळीच घेतलेल्या निर्णयामुळे मोठा अनर्थ टळला. तज्ज्ञ डॉक्टरांनीही योग्य वेळी केलेल्या उपचारांमुळे एका तरुणाला नवजीवन मिळाले.


डॉक्टरांनी सांगितले की, मानसिक तणाव आणि एकटेपणा यामुळे तरुणांमध्ये गंभीर समस्या वाढत आहेत. अशा परिस्थितीत कुटुंबीयांनी संवाद वाढवणे, भावनिक आधार देणे आणि वेळेवर वैद्यकीय मदत घेणे अत्यंत आवश्यक आहे.