कामगारांच्या कष्टांचा गौरव आणि महाराष्ट्र अभिमानाचा जयघोष; एरंडोलमध्ये विद्यार्थ्यां समवेत उत्साहात साजरा विशेष दिवस.
एरंडोल (प्रतिनिधी):एरंडोल येथील रा.ति. काबरे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात १ मे निमित्त महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत कामगारांच्या योगदानाला सलाम केला.
कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या प्रांगणात ‘वंदे मातरम’, राष्ट्रगीत आणि राज्यगीताने झाली. मुख्य लिपिक श्रीकांत बिर्ला यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. यावेळी विद्यार्थ्यांना कामगारांचे हक्क,त्यांची मेहनत आणि समाजातील त्यांचे स्थान याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
मुख्याध्यापक एस. एस. राठी यांनी आपल्या भाषणात कामगारांचे देशाच्या प्रगतीतील योगदान अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले . त्यांच्या परिश्रमामुळेच समाजाची घडी सुरळीत चालते, असेही त्यांनी सांगितले.या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष शरदचंद्र काबरे, उपाध्यक्ष ॲड. महेश काबरे, सचिव राजीव मनियार, उपसचिव धीरज काबरे, संचालक परेश बिर्ला यांची उपस्थिती लाभली.
तसेच विद्यालयाचे उपमुख्याध्यापक पी . एच. नेटके, पर्यवेक्षक पी. एस. नारखेडे, एम. एम. राठी तसेच रा.ही. जाजू विद्या मंदिराच्या मुख्याध्यापिका जयश्री कुलकर्णी, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन पी. ए. चौधरी व प्रा. एस. एस. महाजन यांनी केले.
