एरंडोल (जि. जळगाव) | प्रतिनिधी
दि. 28 एप्रिल 2026 रोजी एरंडोल येथील महाबीज बीज प्रक्रिया केंद्रात महाबीजच्या 50 व्या वर्धापनदिनानिमित्त सुवर्ण महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. या विशेष प्रसंगी कृषी क्षेत्रातील विविध मान्यवर, बियाणे उत्पादक, विक्रेते आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बियाणे उत्पादक भागधारक भागवत पाटील होते. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी, विभागीय बीज प्रमाणीकरण अधिकारी अभिषेक जमधडे, तालुका कृषी अधिकारी शिवदे, विभागीय व्यवस्थापक दर्शन कान्हेड, जिल्हा व्यवस्थापक रविंद्र जोशी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात प्रास्ताविकाने झाली. त्यानंतर कुर्बान तडवी यांनी दर्जेदार बियाण्याचे शेतीतील महत्त्व स्पष्ट केले. दर्शन कान्हेड यांनी महाबीजच्या कार्याचा आढावा घेत जैविक उत्पादनांची माहिती दिली. अभिषेक जमधडे यांनी बियाणे प्रमाणीकरण प्रक्रिया व प्लॉट व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन केले.
बियाणे उत्पादक निंबा पाटील यांनी शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीत महाबीजची भूमिका अधोरेखित केली. यावेळी खरीप 2025 व रब्बी 2025-26 हंगामात उत्कृष्ट बियाणे उत्पादन करणाऱ्या उत्पादकांचा तसेच विक्रीत आघाडीवर असलेल्या विक्रेत्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाबीज जळगाव व एरंडोल केंद्रातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. मनिष दोंदे यांनी कविता सादर करून कार्यक्रमात रंगत आणली. सूत्रसंचालन राहुल भदाणे यांनी केले, तर आभार प्रदर्शन अनिता ठाकरे यांनी केले.
