एरंडोल येथे डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे निर्माल्य संकलन अभियान; सुमारे ४ टन निर्माल्य जमा.
प्रसिद्धी दिनांक: रविवार, सप्टेंबर २७, २०२६
संपादकीय विभाग: बातमीदार महाराष्ट्र न्यूज
 |
| batmidar jalgaon news. |
एरंडोल :- अनंत चतुर्दशीच्या पवित्र मुहूर्तावर एरंडोल येथे डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्यातर्फे निर्माल्य संकलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या उपक्रमाचा शुभारंभ एरंडोल नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री. अमोलजी बागुल व उपनगराध्यक्ष श्री. कृष्णा ओतारी यांच्या शुभहस्ते करण्यात आला. हा उपक्रम सकाळी सुरू होऊन रात्री उशिरापर्यंत यशस्वीरीत्या राबवण्यात आला.
प्रमुख अतिथी म्हणून बोलताना मुख्याधिकारी अमोल बागुल यांनी प्रतिष्ठानच्या सामाजिक व पर्यावरणपूरक अभियानांची सविस्तर माहिती देत मनोगत व्यक्त केले. तसेच निर्माल्य संकलनासाठी श्रीसदस्यांनी घेतलेल्या परिश्रमांचे मनापासून कौतुक केले.
विविध ठिकाणी निर्माल्य कलश...
अभियानांतर्गत शहरातील कासोदा दरवाजा, अमळनेर दरवाजा, मरीमाता चौक, जवखेडा रोडवरील कृत्रिम तलाव आणि श्री.बैठक हॉल या ३ ते ४ ठिकाणी तंबू राखून ‘निर्माल्य कलश’ उभारण्यात आले होते.
कंपोस्ट खतासाठी निर्माल्याचा वापर...
संकलित झालेल्या निर्माल्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी प्रथम ते स्वच्छ करून त्यातील रासायनिक घटक बाजूला काढण्यात आले. उर्वरित शुद्ध निर्माल्य कंपोस्ट खत निर्मितीसाठी पाठवण्यात आले, तर इतर घनकचरा डम्पिंग ग्राउंडवर पोहोचवण्यात आला.
१६६ श्रीसदस्यांचा सहभाग...
या अभियानात श्रीबैठक एरंडोल, गिताई पार्क, आडगाव, कासोदा, तळई, खडके, भातखेडा, पिंप्री, रोळी, जळके आदी परिसरातील सुमारे १६६ श्रीसदस्यांनी उत्स्फूर्त आणि प्रामाणिकपणे सहभाग घेतला. या सर्वांच्या परिश्रमातून जवळपास ४ टन निर्माल्य जमा करण्यात आले. अतिशय उत्साही आणि आनंदी वातावरणात हा कार्यक्रम पार पडला.