विशेष सन्मान: एरंडोलचे नगराध्यक्ष डॉ. नरेंद्र ठाकूर यांचा पाचगणी येथील राज्य परिषदेत भव्य सत्कार.

 

विशेष सन्मान: एरंडोलचे नगराध्यक्ष डॉ. नरेंद्र ठाकूर यांचा पाचगणी येथील राज्य परिषदेत भव्य सत्कार

एरंडोल (प्रतिनिधी):एरंडोल नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. नरेंद्र ठाकूर यांचा महाराष्ट्र भूलशास्त्रतज्ज्ञ संघटनेच्या वतीने पाचगणी (जि. सातारा) येथे आयोजित राज्यस्तरीय परिषदेत विशेष सन्मान करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांचे थेट वंशज तथा महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. ठाकूर यांना ‘गेस्ट ऑफ ऑनर’ (Guest of Honour) म्हणून सन्मानित करण्यात आले.

पाचगणी येथे पार पडलेल्या या राज्य परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यात, वैद्यकीय क्षेत्रातून राजकीय क्षेत्रात प्रवेश करत एरंडोलच्या नगराध्यक्षपदी थेट जनतेतून निवड झाल्याबद्दल डॉ. ठाकूर यांचा हा विशेष सत्कार करण्यात आला.

वैद्यकीय क्षेत्राचा अभिमान – डॉ. अविनाश भोसले

यावेळी बोलताना संघटनेचे राज्य अध्यक्ष तथा परिषदेचे सचिव डॉ. अविनाश भोसले म्हणाले, "संपूर्ण महाराष्ट्रातील भूलशास्त्रतज्ज्ञांसाठी हा अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. आपल्या वैद्यकीय परिवारातील एका सदस्याने वेगळी वाट निवडून राजकीय क्षेत्रात हे उल्लेखनीय यश मिळवले आहे."

राजकारण हे समाजपरिवर्तनाचे माध्यम – डॉ. नरेंद्र ठाकूर

सत्काराला उत्तर देताना नगराध्यक्ष डॉ. नरेंद्र ठाकूर यांनी आपला 'एक भूलशास्त्रतज्ज्ञ ते लोकनियुक्त नगराध्यक्ष' हा संघर्षमय प्रवास आणि त्यामागची भूमिका मांडली. "राजकारण हे समाजपरिवर्तनाचे एक प्रभावी माध्यम आहे, याच उद्देशाने मी आजपर्यंत कार्य करत आलो आहे. राज्य परिषदेने केलेला हा सन्मान आणि दिलेल्या शुभेच्छा माझ्या पुढील वाटचालीसाठी मैलाचा दगड ठरतील," असे प्रतिपादन करत त्यांनी आयोजक व सर्व पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले.

या सोहळ्यास सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, डॉ. माधुरी लिमये, राज्य अध्यक्ष डॉ. अविनाश भोसले यांच्यासह महाराष्ट्र भूलशास्त्रतज्ज्ञ संघटनेचे विविध पदाधिकारी व मोठ्या संख्येने डॉक्टर उपस्थित होते.