प्रतिनिधी बातमीदार, महाराष्ट्र न्यूज वृत्तसेवा.
(Erandol / Jalgaon News /Khandesh)
एरंडोल (Erandol News): प्रवाशांच्या सोयीसुविधांसाठी विविध मागण्यांचे निवेदन एरंडोल शहर संघर्ष समितीच्या वतीने एरंडोल एसटी आगाराचे प्रमुख विजय महाजन यांना देण्यात आले. एरंडोल येथून पुणे व इंदूरकडे जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय दूर करून त्यांना दिलासा द्यावा, अशी प्रमुख भूमिका या निवेदनाद्वारे मांडण्यात आली आहे.
एरंडोल शहरातून मोठ्या संख्येने नागरिक पुणे येथे प्रवास करतात. मात्र, पुरेशा एसटी फेऱ्याअभावी खासगी ट्रॅव्हल्सकडून अवाजवी भाडे आकारून प्रवाशांची आर्थिक लूट होत असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. त्यामुळे एरंडोल ते पुणे रातराणी बससेवा सुरू करून ती कायमस्वरूपी चालू ठेवावी, तसेच एरंडोल ते इंदूर आंतरराज्यीय बससेवा कायमस्वरूपी सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यासोबतच प्रवासी वाहनांसाठी वाहनतळ सुरू करणे, गेल्या चार महिन्यांपासून प्रलंबित असलेले धरणगाव चौफुली आणि विवेकानंद चौक येथील विनंती बस थांबा फलक लावणे, वेळापत्रक अद्ययावत करणे, आगार परिसरात स्वच्छता ठेवणे आणि प्रवाशांसाठी मोफत शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे या मागण्यांचाही निवेदनात समावेश आहे.
या सर्व समस्यांवर आगार प्रमुख विजय महाजन यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली. विनंती बस थांबा फलक या आठवड्यात लावण्यात येतील आणि इतर प्रलंबित प्रश्नही टप्प्याटप्प्याने मार्गी लावले जातील, असे आश्वासन महाजन यांनी दिल्याचे सांगण्यात आले. चर्चा सकारात्मक झाल्याने संघर्ष समितीने समाधान व्यक्त केले.
या शिष्टमंडळात समितीचे अध्यक्ष रवींद्र लाळगे, उपाध्यक्ष नामदेवराव पाटील, सरचिटणीस दिनेश चव्हाण, प्रसिद्धी प्रमुख प्रवीण महाजन, संचालक तुकाराम पाटील, पी. आर. पाटील, दिलीपराव तावडे, गुलाबराव चौधरी, आर. पी. चौधरी यांच्यासह प्रवासी उपस्थित होते.
